श्री संतकृपा इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा.


 घोगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

वाचाल तर वाचाल, वाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज आहे. पुस्तकाचे, ग्रंथांचे वाचन केल्याने माणूस समृद्ध, सुसंस्कारी व ज्ञानी होतो. विद्यार्थ्यांनी शालेय पुस्तकाबरोबर इतरही संदर्भ ग्रंथांचे वाचन केले पाहिजे व आपल्या ज्ञानात जास्तीत जास्त भर केली पाहिजे. असे प्रतिपादन श्री संतकृपा इंजिनिअरिंग बी.टेक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी केले 

घोगाव तालुका कराड, येथील श्री संतकृपा शिक्षण संस्था संचलित श्री संतकृपा इंजिनिअरिंग (बीटेक) महाविद्यालयाच्या लायब्ररी कमिटी मार्फत महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा केला गेला.

भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा वाढदिवस राज्यभरात "वाचन प्रेरणा दिवस" ​​म्हणून साजरा केला जातो. डॉ. कलाम नेहमी म्हणत असत की, एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी डॉ.कलाम यांची पुस्तके वाचावीत, त्याचबरोबर इतर साहित्याचेही जास्तीत जास्त वाचन करावे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या दृष्टीने वाचन प्रेरणा दिवसाचे आयोजन महाविद्यालयामध्ये करण्यात येते.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. भाग्यश्री पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व सर्व उपस्थितांचे स्वागत केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी चे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी होते. कर्यक्रमाची सुरवात प्राचार्य, सर्व विभाग प्रमुख यानी शारदा देवी च्या प्रतिमेला वंदन करुण दीप प्रज्वलने झाली. यावेळी प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी सर्व विद्यार्थ्यांना "वाचन प्रेरणा दिवस" च्या शुभेच्छा दिल्या.

यानंतर महाविद्यालयाच्या लायब्ररी विभाग प्रमुख सौ. दिपाली साळुंखे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अनेक साहित्य,पुस्तके वाचावी, आणि आपल्या जीवनाचा आणि समाजाचा उद्धार करावा. फक्त शालेय पुस्तकी वाचन करण्यापेक्षा अवांतर वाचन करणे आवश्यक आहे. अवांतर वाचन केल्याने विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात, त्यांची आकलन शक्ती वाढते. इतरांवर आपल्या ज्ञानाचा प्रभाव टाकण्यासाठीही अवांतर वाचनाचा उपयोग होतो, हे महत्व त्यांनी यावेळी समजावून सांगितले.

प्रा. अर्चना पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवर, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानले. 

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षक , शिक्षकेतर स्टाफचे संस्थेचे सचिव प्रसुन जोहरी यांनी अभिनंदन केले व कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व लायब्ररी कमिटी सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.