सहकार क्षेत्रामुळेच महाराष्ट्राचा विकास : अशोकराव थोरात


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर सर्व क्षेत्रात सहकार चांगला रुजला, वाढला व त्यामुळे गरीब शेतकरी व बहुसंख्य जनतेची प्रगती झाली. पर्यायाने सहकारामुळेच महाराष्ट्राची प्रगती झाली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, छोटे बलुतेदार, व्यवसायिक, मेंढपाळ, पशुपालक इत्यादी सर्व घटकांना सहकारामुळे देशाच्या प्रगतीचा लाभ मिळाला. त्याचबरोबर मध्यमवर्ग व वरचा मध्यमवर्ग यांनाही सहकार क्षेत्राच्या माध्यमातून भांडवल उभारणीपासून उद्योग व्यवसाय व छोटी मोठी घरे, कॉलनी उभी करता आली. परंतु या सहकार क्षेत्राची प्रगती थांबून पठारावस्था व अधोगतीकडे वाटचाल होतेय काय? अशी शंका येऊ लागलीय. म्हणूनच आजच्या या सहकार परिषदेत या क्षेत्रातील आपण मंडळी उपस्थित आहात.सहकार क्षेत्र फार मोठे असून त्यातील काही घाण वेळीच काढून टाकली तर स्वच्छ पारदर्शक पवित्र राहील अशी आशा व्यक्त केली. तसेेच अभ्यासू प्राध्यापक आज आपणा सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत असे विचार सहकार परिषदेचे उदघाटक शेतीमित्र अशोकराव थोरात मळाई ग्रुप मलकापूर कराड आणि कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार सप्ताह निमित्त शनिवार दि.19नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित राज्य सहकार परिषदेत ते बोलत होते.


 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डाॅ. शरद शेटे , उपनिबंधक सहकारी संस्था कराडचे संदिप जाधव, प्रमुख वक्ते प्राचार्य जे.के.पवार, प्रा.डॉ.लालासाहेब घाटगे, प्रा.डॉ.अनिल वावरे, प्रा.डॉ.नेताजी पवार, मलकापूर नगरपालिका विरोधी पक्षनेते अजित थोरात ,सौ.अरूणादेवी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.   

  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डाॅ. शरद शेटे यांनी अध्यक्षीय भाषणात सहकार क्षेत्रातील राजकारण, सहकारातील भ्रष्टाचार, सहकारी कारखाने, सहकारातील घराणेशाही यांची सद्यस्थिती मांडली. 

    प्रास्ताविकामध्ये कनिष्ठ महाविद्यालय अर्थशास्त्र राज्य विचारमंचचे समन्वयक सतिश जंगम यांनी सहकार क्षेत्राचा आढावा घेऊन सहकार क्षेत्राला आजच्यापेक्षा अधिक ऊर्जीतावस्थेत येण्यासाठी अनेक उपाय सुचविले. विशेषता ग्रामीण अर्थव्यवस्था व महिलांचा विकास दुग्ध व्यवसायामुळे व सहकार क्षेत्रामुळे झाल्याचे त्यांनी नमूद केले. 

 प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी जागतिक स्तरावरील सहकारी चळवळीचा आढावा घेऊन जागतिकीकरणामध्ये सहकारी चळवळीचे असणे, टिकणे व वाढणे का गरजेचे आहे? याचा उहापोह केला. 

 प्रमुख वक्ते प्रा. डाॅ. लालासाहेब घाटगे यांनी आपल्या भाषणामध्ये सहकाराची तत्वे समजावून दिली. सभासदांची कर्तव्ये, सहकार क्षेत्रातील सर्व घटकांना प्रशिक्षण देणे व सहकारांतर्गत सहकार वाढवणे,ते कसे वाढवणे आवश्यक आहे. याची माहिती दिली. विशेषता सहकार क्षेत्राची सामाजिक बांधिलकी त्यांनी समजावून दिली.

           सहकारी संस्था कराडचे उपनिबंधक संदीप जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतिश जंगम,प्रा.शीला पाटील यांनी तर आभार प्रा.रामकृष्ण पाटील यांनी मानले.