मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.

ढेबेवाडी|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची पाहणी केली. ग्रामपंचायतीने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल समितीच्या सदस्यांनी गावकऱ्यांचे कौतुक केले. भविष्यात मान्याचीवाडी ग्रामपंचायत देशांमध्ये ग्रामविकासात दिशादर्शक ठरेल असा विश्वास समिती सदस्यांनी व्यक्त केला. 

   राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अवर सचिव चंद्रकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन कक्ष अधिकारी बाळासाहेब हजारे, विशेष निमंत्रित दीपक दाईटकर, अभिजीत खरपुडे यांनी गावाची पाहणी केली. त्यांना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण साईमोते, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, गटविकास अधिकारी गोरख शेलार, गटशिक्षणाधिकारी दीपा बोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद खराडे, उप अभियंता सुभाष घंटे, माजी शिक्षण सभापती उत्तमराव माने, सरपंच रवींद्र माने, ग्रामसेवक प्रसाद यादव, स्वच्छता तज्ञ राजेश इंगळे आदींनी माहिती दिली.

   पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने वीस वर्षांपासून ग्रामविकासामध्ये वेगवेगळे प्रयोग करत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. विभाग स्तरावर या ग्रामपंचायतीने बाजी मारल्याने राज्यस्तरासाठी निवड झाली होती. त्यासाठी या ग्रामपंचायतीने राबवलेल्या पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, गांडूळ खत प्रकल्प, शौचालय व्यवस्थापन, परसबागा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आदींसह ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणी करण्यात आली. तसेच समिती सदस्यांनी संपूर्ण गावांमध्ये पाहणी करून गावातील पुरुष महिलांसह तरुणांशीही संवाद साधला.

  यावेळी अपर सचिव चंद्रकांत मोरे म्हणाले आतापर्यंत या ग्रामपंचायतीने केलेल्या कामांची माहिती घेतली असता निश्चितच छोट्या लोकसंख्येच्या या गावाने ग्रामविकासात मोठे योगदान दिले आहे. भविष्यात मान्याचीवाडी देशपातळीवर ग्रामविकासातील दिशादर्शक म्हणून आपली ओळख निर्माण करेल. प्रास्ताविक सरपंच रवींद्र माने यांनी केले. ग्रामपंचायत सदस्य दिलीप गुंजाळकर यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य उत्तमराव माने यांनी आभार मानले.