तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
संविधानामुळेच आजही आपल्या देशाचे ऐक्य व एकात्मता अबाधित आहे. जगातील सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे महत्त्व अधोरेखित करणारा संविधान दिवस साजरा करताना आपल्या लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा निर्धार करूया! सर्वसामान्य माणसाला जगण्याचा मुलभूत अधिकार देणारे भारतीय संविधान हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अरुण गाडे यांनी केले. याप्रसंगी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. व भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या वतीने संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरूण गाडे हे होते.
ते पुढे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड कष्ट घेऊन भारताच्या आदर्श संविधानाची निर्मिती केली. सत्य, न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता या तत्वांचा पुरस्कार करणारे संविधान प्रत्येक भारतीय नागरिकाने समजून घेणे गरजेचे आहे. यावेळी संविधान दिनाचे औचित्य साधून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मनोरंजनातून विकास हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत पोतदार (राज्य प्रधान सचिव अंनिस) तर भगवान रणदिवे, मा. शिवाजी बोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रशांत पोतदार म्हणाले, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दुसरं नाव 'डोकं चालवा चळवळ वैज्ञानिक दृष्टिकोनाची पहिली पायरी निरीक्षण करणे ही आहे. वेळी त्यांनी पाणी भरलेला दिवा पेटवून दाखवत विद्यार्थ्यांमध्ये अंधश्रद्धाविषयक जागृती केली. ते म्हणाले आपल्याकडे चिकित्सक वृत्ती असायला हवी. भगवान रणदिवे यांनी अंगात येणे हा प्रकार प्रात्यक्षिकांसह सादर केला. स्त्रियांच्या अंगात मोठ्या प्रमाणात येते त्याला कारण पुरुषप्रधान संस्कृती आहे. स्त्री कायमच धाकात राहते. धाकापासून मुक्ती मिळविण्याचा मार्ग म्हणजे अंगात येणे. अंगात येणे सोंग - ढोंग किंवा मानसिक आजार होय. अंगात आलेली व्यक्ती चमत्कार करते. चमत्कार, फसवाफसवी पासून आपण पेटून उठले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी- विद्यार्थिनी, गुरुदेव कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. या समारंभासाठी प्राचार्य अभयकुमार साळुंखे (कार्याध्यक्ष, श्री स्वा.वि. शि. संस्था, कोल्हापूर) मा. प्राचार्या शुभांगीताई गावडे (सचिव, श्री. स्वा. वि. शि. संस्था, कोल्हापूर)तसेच संस्था पदाधिकारी यांची प्रेरणा लाभली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. अरुण गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुदेव कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा.सुनिल कुंभार यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. सौ. जे. व्ही. बाऊचकर यांनी केले. आभार प्रा. सचिन पुजारी यांनी मानले.