शिवसागर जलाशयात धावणार वॉटर अ‍ॅम्ब्युलन्स , श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; दुर्गम भागासाठी मोठी सुविधा


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये वसलेल्या गावांना आरोग्य सेवा पुरवण्याकरिता वॉटर अ‍ॅम्ब्युलन्सला मंजुरी मिळाली आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडून सातत्याने सुरू असलेल्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे. त्यासाठी सुमारे ९४ लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे. ती वॉटर अ‍ॅम्ब्युलन्स महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा परिसरात कार्यरत होणार आहे.

जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर तालुक्यातील कोयनेच्या शिवसागर जलाशयामध्ये बसलेल्या गावांना आरोग्याची उत्तम सोय मिळावी, यासाठी मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. दुर्गम भागातील लोकांच्या आरोग्यविषयक समस्या सुटाव्यात, यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी यापूर्वी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त यांच्याकडे दूरध्वनीद्वारे व लेखी पाठपुरावा केला होता. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांनी कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात वॉटर अॅम्ब्युलन्स खरेदी करण्यासाठी व इतर आरोग्यविषयक सुविधांसाठी निधी मंजूर होत असल्याचे खासदार पाटील यांना काही दिवसांपूर्वी पत्राद्वारे कळवले होते. त्या अनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एक वॉटर अ‍ॅम्ब्युलन्स करिता मंजुरी मिळाली आहे. जावळी तालुक्यातील बामणोली परिसरासाठी दुसरी वॉटर अ‍ॅम्ब्युलन्स मंजूर होण्याकरिता प्रशासनाकडून सुधारित प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. कोयना धरणाच्या बॅक वॉटरच्या पश्चिमेस अतिशय दुर्गम डोंगराळ भागांमध्ये २५ हून जादा गावे स्थित आहेत. या ठिकाणी जलद दळणवळणाची साधने उपलब्ध नाहीत. धरणामध्ये पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून दुर्गम आणि डोंगरी भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना आरोग्यविषयक अडचणीच्या काळात इतर ठिकाणी जाण्यासाठी व आरोग्य सुविधा मिळण्यासाठी महत्त्वपूर्ण मदत होणार आहे, तसेच अॅम्ब्युलन्ससह देखभाल दुरुस्ती, कर्मचारी वेतन याची देखील तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.