स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार.

 

उंडाळे|कृष्णाकाठ वृत्तसेवा:                          ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळे संचलित येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास तृतीय क्रमांकाचा राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2019, दि. 17 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयाद्वारे जाहीर झाला आहे. 50 हजार रुपये रोख सन्मानपत्र,स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अशी माहिती विद्यालयाची प्राचार्य बी आर पाटील यांनी दिली.                         

श्री. पाटील म्हणाले, वनश्री पुरस्कारासाठी राज्य स्तरावर विद्यालयास तृतीय क्रमांक मिळाला असून पन्नास हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह असे त्याचे स्वरूप आहे. तर पुणे विभागात विद्यालयात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असून 25 हजार रुपये रोख प्रशस्तीपत्र स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्य आणि विभागीय अशा दुहेरी स्तरावर विद्यालयाने यश प्राप्त केले आहे. 

यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक जे एस माळी, उच्च माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. सुरेश वेदपाठक, श्री. शंकर आंबवडे आर. जी. सुतार, बादशाह शेख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.                      

प्राचार्य पाटील म्हणाले वृक्ष संवर्धन, निसर्ग संवर्धन,पर्यावरण याबाबतीत विद्यालयात निमितपणे विविध उपक्रम सुरू असतात. विद्यालयातील हरीत सेना समन्वयक जे. एस. माळी यांच्या कल्पकतेतून आजपर्यंत विद्यालयाकडून उन्हाळी सुट्टीत रोपवाटिका तयार करण्यात आल्या होत्या. सदर रोपांचे उंडाळे परिसरातील वाडी, डोंगर वस्ती, डोंगर यावर त्याचे रोपण करण्यात आले यासाठी विद्यालयाने शेवाळवाडी, सावंतवाडी आदी गावे दत्तक घेऊन वृक्षारोपण केले. घर तिथे झाड असा उपक्रम यशस्वीपणे राबवला दरवर्षी विद्यार्थ्यांना रोपांचे वितरण करून हे उपक्रम राबवले जात आहेत. 

सुमारे 300 वर कुंड्यांमध्ये विविध प्रकारची झाडे लावून विद्यालयाच्या वतीने फिरती बाग तयार केली आहे. पर्यावरणाला हानी पोचू नये यासाठी दिवाळीत विद्यार्थ्यांना फटाका मुक्त दिवाळी साजरी करण्यास प्रवृत्त केले जाते. गणेश उत्सवामध्ये पर्यावरण पूरक देखावे करण्यासाठी मंडळांना आवाहन केले जाते. शाडूच्या माती पासून मूर्ती बनवण्याची कार्यशाळा ही प्रतिवर्षी आयोजित केली जाते. रक्षाबंधन निमित्त झाडांना राखी बांधून विद्यार्थ्यांना झाडाबद्दल आत्मियता निर्माण केली जाते. प्लास्टिक वापर टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना कागदी व कापडी पिशव्या बनवून त्याचे वाटप केले. जाते. होळीमध्ये झाड अथवा फांदी न पेटवता कचरा पेटवून कचऱ्याची होळी केली जाते. यासह निसर्गामध्ये वनश्री फुलवण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. उन्हाळ्यात पक्षासाठी खाद्य व पाण्याची सोय केली जाते, तसेच शालेय परिसरात विविध फळझाडे लावण्यात आली असून शालेय पोषण आहारासाठी परस बाग केली असून त्यात विविध प्रकारच्या भाज्या आहेत असे हे उपक्रम अखंडपणे विद्यालयामध्ये सुरू आहेत या पुरस्कारामुळे या कामासाठी अजून ऊर्जा मिळाली आहे.

पुरस्कार जाहीर झाल्याबदल ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष जयसिंगराव पाटील बापू, विद्यमान अध्यक्ष ॲड. आनंदराव पाटील, सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, गटशिक्षणाधिकारी सन्मती देशमाने, केंद्रप्रमुख सदाशिवआमणे, ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सचिव बी.आर.यादव, उपाध्यक्ष शंकरराव पाटील, संचालक मंडळ, संस्थेचे निरीक्षक यांनी राज्य पातळीवरील विद्यालयाचा गुणगौरवाबद्दल समाधान व्यक्त करून .प्राचार्य बी आर पाटील, हरित सेना समन्वयक जगन्नाथ माळी, आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वाच्या प्रयत्नांचा चांगला परिणाम झाल्याचे मत व्यक्त केले.