शैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.

दिशा समितीच्या बैठकित केल्या विविध मागण्या.



तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीची बैठक खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्यासह समितीचे सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीवेळी जिल्हा विकास समन्वयक व सनियंत्रण (दिशा) समितीचे सदस्य मारुतीराव मोळावडे यांनी विद्यार्थ्यांसाठी व नागरिकांसाठी विविध मागण्या केल्या.

शैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याची प्रमुख मागणी मारुतीराव मोळावडे यांनी बैठकीत केली. तसेच तळमावले हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणी क्रीडा संकुल असावे अशी मागणी ही त्यांनी केली.



या वेळी बोलताना मारुतीराव मोळावडे म्हणाले की, जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल असणे गरजेचे आहे. मात्र, पाटण सारख्या दुर्गम आणि डोंगराळ तालुक्याला क्रीडा संकुलाची सोय नाही. विद्यार्थ्यांसह खेळाडूंचं मोठं नुकसान होत आहे. गावागावांतून खेळाडू निर्माण झाले पाहिजेत, असा खेलो इंडिया योजनेचा उद्देश असताना क्रीडा संकुलच नसेल तर खेळाडूंना वाव कसा मिळेल? 

त्यामुळे पाटण तालुक्यातील क्रीडा संकुल हे तळमावल्यासारख्या ठिकाणी व्हावे. तळमावले हे मध्यवर्ती ठिकाण आहे तसेच जागेची ही उपलब्धता आहे.

त्याचबरोबर तालुक्यामध्ये ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा परिषदेची प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत तरीसुद्धा रुग्णांना त्या ठिकाणी अपेक्षित सोयी सुविधा उपलब्ध होत नसल्याने खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सोयी-सुविधा मिळाव्यात.

तसेच प्राथमिक शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा या भौतिक सुविधांनी परिपूर्ण झाल्यास निश्चितच गुणवत्ता पूर्ण शिक्षण या ठिकाणी मिळेल, त्यासाठी शाळांमध्ये वीज, शौचालय आणि इतर सुविधा मिळाव्यात, अशी मागणी ही या वेळी त्यांनी केली.