कष्टकरी, माथाडी कामगारांनो एकसंघ व्हा:नरेंद्र अण्णासाहेब पाटील


नवीमुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
 कष्टकरी माथाडी कामगारांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी व्यापार आणि काम वाढले पाहिजे, त्यासाठी व्यापारी, बाजार समिती, कामगार व अन्य घटकांनी एकसंघ रहाणे गरजेचे आहे, व्यापारी व कामगारांवर येणा-या प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या माथाडी कामगार संघटनेने सतत पुढाकार घेतला आहे, आपल्या एकसंघ शक्तीने शासनाकडून आपले प्रश्न सोडविता येतील, असे उद्गार महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार व शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष (मंत्री दर्जा) नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी काढले. महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष (मंत्री दर्जा) पदी निवड झाल्याबद्दल नव्यामुंबईतील एपीएमसी मसाला मार्केटमधील तमाम माथाडी कामगार, वारणार, व्यापारी, पालावाला महिला कामगार व अन्य घटकांच्यावतिने सत्कार आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी नरेंद्र अण्णासाहेब पाटील बोलत होते. माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील पुढे म्हणाले की, एपीएमसी मार्केट आवार व इतर ठिकाणी कामे कमी झाल्यामुळे माथाडी कामगार व त्यांच्या कुटुंबियातील सदस्य व्यवसाय करीत आहेत, अशा लघु उद्योगाला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जाईल, कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेली ऐतिहासिक माथाडी कामगार केंद्रबिंदू मानून माथाडी कामगार व मराठा समाजासाठी कार्य करीत रहाणार. यावेळी मसाला मार्केटमधील धडाडीचे कार्यकर्ते जितेंद्र येवले यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक भाषण केले, यावेळी व्यापारी असोसिएशन पदाधिकारी व बाजार समितीचे माजी संचालक मोहनभाई गुरनानी, किर्ती राणा तसेच मसाला मार्केट कार्यकर्ते सर्वश्री दिनकर सनुगले, शंकर चोरगे, संतोष अहिरे, श्रीमंत शिंदे, सखाराम शेलार, संभाजी पाटील आदींची भाषणे झाली, दिनकर सनुगले यांचेसह कार्यकर्त्यांनी नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याची माहिती देत मार्केट आवारातील कामगारांचे प्रश्न मांडले. सत्कार समारंभाचे सूत्रसंचालक युनियनचे जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख व सेक्रेटरी अशोक दुधाणे यांनी केले. या सत्कार समारंभास महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, ऋषिकांत शिंदे, उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील, कायदेशिर सल्लागार अड्. भारतीताई पाटील, व्यापारी प्रतिनिधी मोहनभाई गुरनानी, किर्ती राणा व मसाला मार्केटमधील विविध असोसिएशन व फामचे पदाधिकारी सर्वश्री अशोक जैन, दिपक शहा, अमरीशभाई बारोट, प्रदिपभाई गाला, मनीलालभाई, चंदूभाई पटेल, शामभाई मेहता, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे मसाला मार्केट आवारात कार्यरत असलेले अधिकारी सर्वश्री मेश्रामसाहेब, देशमुखसाहेब तसेच दाणाबंदर मार्केट, कांदा-बटाटा मार्केट, भाजीपाला व फळे मार्केटमधील कार्यकर्ते आदी उपस्थित होते. मसाला मार्केटच्या जावक गेटवरुन नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना मार्केटमधील सर्व घटकांनी मिरवणुकीने कार्यकम स्थळी आणले आणि येथे त्यांचा वेलची व ड्रायफ्रुटचा हार, गदा, शाल, श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.