महिला स्वावलंबी होण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण अतिशय उपयुक्त: सरपंच सारिका पाटणकर.

 


तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

ग्रामीण भागातील महिलांनी स्वयंरोजगार करून स्वबळावर उभे राहणे काळाची गरज आहे यासाठी महिलांना कौशल्य, विकास प्रशिक्षण शिबिर अतिशय उपयुक्त ठरते असे प्रतिपादन कुंभारगाव तालुका पाटण ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सारिका पाटणकर यांनी व्यक्त केले.

कुंभारगाव ग्रामपंचायत व आदर्श महिला बहुउद्देशीय संस्था, पेठवडगाव कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने १५ वा वित्त आयोग अंतर्गत ३ दिवशीय कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता. यावेळी कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्व महिलांसाठी राजेसंघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने हळदीकुंकू समारंभ ही आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी कुंभारगाव व कुंभारगाव परिसरातील बहुसंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.या सर्व सहभागी महिलांचे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सारिका पाटणकर यांनी स्वागत केले.

यावेळी पुढे मार्गदर्शन करताना सरपंच सौ सारिका पाटणकर म्हणाल्या अशा कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिरात विविध प्रकारची उत्पादने कशी तयार करावी त्यासाठी कोणता कच्चामाल वापरावा तयार उत्पादनानंतर त्याची बाजारपेठ व छोटे छोटे उद्योग उभारून स्वावलंबी होण्याचे मार्गदर्शन मिळते. या प्रशिक्षण शिबिरातून महिला स्वावलंबी होऊन स्वतःचा छोटा उद्योग उभारू शकतात यासाठी अशा प्रकारच्या कौशल्य विकास प्रशिक्षणात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन अशा शिबिरांचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी महिलांना केले.

या राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानाअंतर्गत महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमां अंतर्गत केक मेकिंग, मेणबत्ती तयार करणे, वॉशिंग पावडर तयार करणे, फिनेल लिक्विड सोफ बनवणे, विविध प्रकारचे मसाले तयार करणे, कागदी बॅग बनविणे आदी उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले.

या प्रशिक्षण शिबिरात आदर्श महिला संस्थेच्या नीलम मॅडम व प्रिया मॅडम या प्रशिक्षकांनी महिलांना उत्तम प्रकारे माहिती देऊन प्रशिक्षण दिले व कौशल्य विकासाचे महत्त्व पटवून दिले.

 सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्या वैशाली गुरव, धनाजी बोरगे, माजी सरपंच प्राजक्ता देवळेकर, दीक्षित मॅडम, ग्रामसेवक अनिल जाधव तसेच राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष राजेंद्र देसाई, ॲड. संपतराव चव्हाण, युवराज चव्हाण, दिलीप देसाई, प्रकाश देसाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

यावेळी प्रशिक्षणासाठी सहभागी झालेल्या महिला, तसेच आदर्श महिला संस्थेच्या प्रशिक्षकांचे सरपंच सौ सारिका पाटणकर यांनी स्वागत केले. 

प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी उपस्थित प्रशिक्षणार्थी महिला तसेच आदर्श महिला बहुउद्देशीय संस्थेच्या प्रशिक्षिका व ग्रामस्थ यांचे आभार मानले.