नरेंद्र पाटील यांनी स्वीकारला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळचा पदभार


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महांडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी महामंडळाच्या जी.टी. हॉस्पीटल कंपाऊंड, बी. टी. मार्ग, जे. जे. स्कूल ऑफ आर्टसच्या मागे, सीएसएमटी स्टेशनजवळ, मुंबई येथिल कार्यालयात पदभार स्विकारला.

याप्रसंगी महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार प्रसादजी लाड, निरंजनजी डावखरे, नरेंद्र पाटील यांच्या धर्मपत्नी व प्राना फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. प्राची पाटील, महामंडळाचे अधिकारी तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्हे व तालुक्यातील मराठा कार्यकर्ते आणि महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस रविकांत पाटील, दिलीप खोंड, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख, कायदेशिर सल्लागार अॅड. भारतीताई पाटील, अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी पतेपढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश अण्णासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कार्यालयापर्यंत माजी आमदार व नवनिर्वाचित अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचे भव्य मिरवणुकीमध्ये महामंडळाच्या कार्यालयात आगमन झाले व त्यांनी अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे. ती समर्थपणे सांभाळून मराठा युवकांना उद्योजक करण्यासाठी सतत प्रयत्नशिल राहिन, अशी प्रतिक्रिया माजी आमदार व अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली. आमदार प्रसादजी लाड, निरंजनजी डावखरे आदी मान्यवरांनी अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना शुभेच्छा दिल्या.