'स्पंदन' कडून ऊसतोड कामगारांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड कामगारांनी आपल्या घरापासून, नातलगांपासून शेकडो किलोमीटर दूर मान्याचीवाडी (कुंभारगाव) या ठिकाणी येवून आपलीे पाले उभारली आहेत. ऊन, वारा, थंडी आणि सध्या पडत असलेला अवखाळी पाऊस विसरुन हे कष्टकरी अपार मेहनत करत आहेत. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील चि.स्पंदन रेश्मा संदीप डाकवे याच्या आठव्या वाढदिवसाचे आणि दिवाळीचे औचित्य साधत ऊसतोड कामगारांना उसाच्या फडात जावून दिवाळी कीट साहित्य देण्यात आले. यावेळी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य चे संस्थापक/अध्यक्ष डॉ.संदीप डाकवे, पोपट माने, प्रदीप माने, मनोज सावंत, किसन माने (तात्या) व अन्य उपस्थित होते.  

ऊसतोड कामगार पहाटेपासूनच ऊसाच्या फडामध्ये जावून ऊसतोडणी काम करीत असतात. हे ऊसतोड कामगार व त्यांचे कुटूंबीय दिवाळी सणापासून वंचित राहून नयेत यासाठी दिवाळी कीट वाटप करण्यात आले आहे. रवा, चणा डाळ, साखर, खाद्यतेल अशाप्रकारचे साहित्य या कीटमध्ये आहे.

चि.स्पंदनचे आजोबा राजाराम डाकवे (तात्या) यांचे सुमारे एक महिन्यापूर्वी आकस्मिक निधन झाले आहे. त्यामुळे यंदा स्पंदन चा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय डाकवे कुटूंबियांनी घेतला. आतापर्यंत स्पंदनच्या प्रत्येक वाढदिवसाला एक सामाजिक उपक्रम राबवण्याचा आला आहे. यंदाचा वाढदिवस साजरा न केल्यामुळे त्या सामाजिक उपक्रमात खंडू पडू नये यासाठी छोटेखानी दिवाळी कीट वाटप करण्यात आले असल्याचे मत स्पंदनचे वडील डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केले.

यापूर्वी स्पंदनच्या वाढदिवसानिमित्त ‘नाम’ फाऊंडेशन, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजला निधी, ग्रंथतुला करुन जमलेली सर्व पुस्तके जि.प.शाळेला, दिव्यांग मुलांना चित्रकलेचे साहित्य, शांताई फाऊंडेशन ला जीवनावश्यक वस्तू दिल्या आहेत. गरजू विध्यार्थी यांची शैक्षणिक फी भरली आहे. याशिवाय श्री बालाजी मतिमंद मुलांच्या शाळेस मदत अशाप्रकारे चि.स्पंदनचा प्रत्येक वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला आहे.

तसेच गरजू, होतकरु विद्यार्थी यासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत वह्या वाटप, स्कूल बॅग-संगणकासाठी आर्थिक सहकार्य, एक वही-एक पेन, माणूसकीच्या वह्या, ज्ञानाची शिदोरी, तक्ते वाटप, गणवेश वाटप, प्राथ.शाळा डाकेवाडी आणि  कराड नगरपरिषद अंगणवाडी रंगकाम व बोलक्या भिंती, कुठरे-जांभूळवाडी शाळेला प्रतिमा वाटप, गुणवंतांच्या घरी जावून सत्कार, 3 री विद्यार्थी स्वाध्याय माला वितरण, सॅल्युट कार्ड स्पर्धा, किल्ले बनवा स्पर्धा, ग्रंथालयांना दिवाळी अंक वितरण, मान्यवरांचे स्वागत पुस्तके देवून असे शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. त्या माध्यमातून सुमारे 200 पेक्षा जास्त मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली आहे.

सामाजिक जबाबदारीचे भान ओळखत डाॅ.संदीप डाकवे यांनी राबवलेले उपक्रम नक्कीच अभिनंदनीय आहेत. या उपक्रमाला बाळासाहेब कचरे, प्रा.ए.बी.कणसे, आई गयाबाई डाकवे, पत्नी सौ.रेश्मा डाकवे, भरत डाकवे, आप्पासोा निवडूंगे तसेच स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभते.

चि. स्पंदन डाकवे याच्या आठव्या वाढदिवसाचे आणि दिवाळीचे औचित्य साधून ऊसतोड कामगारांना दिवाळी कीट देवून त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न 'स्पंदन' आणि डाकवे परिवाराने केला आहे. डाकवे परिवाराच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

_________________________________ 

ऊसतोड मजुरांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहुन समाधान 

वडिलांच्या आकस्मिक जाण्याचे दुःख अजूनही आमच्या कुटूंबावर आहे. परंतू याही स्थितीत स्पंदनच्या वाढदिवसाच्या उपक्रमात खंड पडू नये यासाठी समाजभान जपणारा हा उपक्रम राबवला आहे. दिवाळी किट दिल्यानंतर मजुरांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून उपक्रम राबवल्याचे समाधान वाटले असे मत स्पंदनचे वडील डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केले आहे. 

_________________________________