मुले रमली मोबाईल गेम्समध्ये; दिवाळीतील किल्ले इतिहासजमा होण्याच्या मार्गावर


तळमावेल|कृष्णाकाठ वृत्तसेवा :
दिवाळी म्हंटले की सर्वत्र किल्ला बनविण्यासाठी लहानग्यांची धडपड सुरू होत असे. आपला किल्ला सुबक कसा करता येईल याकडे प्रत्येकजण बारकाईने लक्ष देत असे. दिवाळीच्या सुट्या सुरू झाल्या की किल्ला तयार करण्याची लगबग सुरू होत असते. विविध किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्याची लहानांच्या विश्वातला आणि मोठ्यांच्या आठवणीतली परंपरा सध्याच्या 'स्मार्टफोन'मुळे विसरत चालली आहे.

पूर्वी मातीचे किल्ले घरोघरी तयार केले जात असे. दिवाळीच्या सुट्यांमधे मुलांसाठी ही उत्साहाची आणि आवडीची गोष्ट असत. सध्याच्या स्मार्ट फोनच्या जगात मुले व्हर्च्युअल गेम्स मध्येच अधिक रमत असल्याने किल्ले तयार करण्यासाठीचा उत्साह कुठेतरी कमी होत चालला असल्याचे चित्र आहे. दिवाळीतील हे दृश्य इतिहासजमा होत चालले आहे.

महाराष्ट्र संस्कृतीत गडकोटांना प्राचीन स्थान आणि महत्त्व आहे. आमच्या पराक्रम आणि संघर्षांची ही प्रतीके आहेत. या गडकोटांच्या स्मृती जपाव्यात आणि पूर्वजांच्या पराक्रमाच्या नौबती पुन्हा घडाव्यात जणू यासाठीच या किल्यांचे महत्व ग्रामीण भागातील मुले विसरायला लागली आहेत. गावातील लोकांची शहराकडे ओढ व गावातील लहान मुलांचे कमी प्रमाण हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा असून, यामुळे आपल्या संस्कृतीत बदल व्हायला लागला आहे हे दिसून येत आहे.

किल्ला हा शौर्याचे, ध्येयाचे प्रतीक मानले जात असून, दिवाळीत किल्ला बांधला की सकारात्मकतेचे बीज मनामध्ये रुजवण्याचे काम होत असे. शिवाय दिवाळीच्या सुटीत एक विरंगुळाही लहान मुलांना मिळत असे. छ्त्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांचा खरा इतिहास मुलांना समजवायचा असेल तर दगड-मातीचे किल्ले बनवणे हा पर्याय आहे. जेणेकरून पुढील पिढीला आपली संस्कृती काय याची जाणीव नक्कीच होईल.

___________________________________

महाराष्ट्राला गड-किल्ल्यांची समृद्ध परंपरा आहे. ही परंपरा भावी पिढीला कळावी, त्यांनी ती जपावी, यासाठी किल्ल्यांची माहिती मुलांना देणे, त्यांनी किल्लेसफरीत सहभागी होणे अशा उपक्रमांची गरज असते. त्यामुळे दिवाळीच्या सुटीत किल्ला करणे हा त्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. तो ग्रामीण भागातील मुलांनी आपली ही संस्कृती जोपासली पाहिजे.

- ओंकार अनिल शिंदे, कुठरे (मोळावडेवाडी)

___________________________________