सिताई फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सिताई नवदुर्गा पुरस्काराने गौरव.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न. 



तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
तळमावले येथे लोकनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून सिताई फाउंडेशनच्या अध्यक्षा कविता कचरे यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नऊ महिलांना सिताई नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.

सीमा घारगे,राधिका पन्हाळे, रोहिणी पाटील, सरिता घारे, विद्या नारकर, रेखाताई देशपांडे, प्रिती गुरव,वनिता शिर्के,दिपाली खोत व सुनिशा शहा यांचा पुरस्कार प्राप्त महिलांमध्ये समावेश होता.

या वेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना चित्रा वाघ म्हणाल्या की संघर्ष तुमच्या पाचवीलाच पुजला आहे. आईच्या पोटात असल्यापासून ते सरणावर पोहोचेपर्यंत महिलांच्या जीवनातील संघर्ष संपत नाही. विविध देवींची रूपे तुम्ही आहात पण, आता लढाई वेगळी आहे. समाजातील विकृती विरूद्ध तुम्हाला लढाई लढायची आहे. त्यासाठी शिक्षण व कायदा हिच शस्त्रे तुम्हाला वापरावी लागतील.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात बचतगटांना मोठे महत्व आहे. राज्यात महिला बचतगटांची विविध उत्पादने वर्षातील बाराही महिने विकता येतील अशी योजना लवकरच आणून ती प्रभावीपणे राबविणार असल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सांगितले. या नंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भरत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.  

सिताई उद्योग समूहाच्या संस्थापिका अध्यक्षा कविता कचरे या आमच्या प्रेरणास्थान असल्याचे अनेक सत्कारमूर्तीनी आपल्या भाषणात सांगितले. यानिमित्ताने विविध बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्याच बरोबर आरोग्य शिबिरही राबवण्यात आले होते. या वेळी काही महिलांचे विशेष सत्कारही करण्यात आले. 

यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य भरत पाटील, सरपंच शोभाताई भुलुगडे, डॉ.सारिका गावडे, फत्तेसिंह पाटणकर, अमित पाटील, महादेव साळुंखे, डॉ. उमेश गोंजारी, विद्याताई पावसकर उपस्थित होत्या.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता कचरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. दीपक तडाखे यांनी केले.