लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यापासून सुरू झालेली लोकसेवेची, पाटणच्या विकासाची परंपरा यापुढेही कायम ठेवू:ना. शंभूराज देसाई

नवी मुंबईतील भव्य नागरी सत्कार सोहळ्यात ना.देसाई यांची ग्वाही.



नवी मुंबई |कृष्णाकाठ वृत्तसेवा:
पाटण विधानसभा मतदारसंघातील अनेकजण नोकरी धंद्यानिमित्त मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात वास्तव्याला आहेत. आपल्या गावाशी,पाटणशी असलेली त्यांची नाळ कायम आहे. ते नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांनी आज केलेला माझा भव्य नागरी सत्कारा मुळे व सन्मानामुळे एक ऊर्जा प्राप्त होते.

आपल्या मातीतल्या माणसाने मुंबईसारख्या ठिकाणी माझी राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल व सातारा व ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल भव्य कार्यक्रम आयोजित करून माझे कौतुक केले. आपली माणसं मुंबईसारख्या ठिकाणी राहूनही आपल्या मातीशी नाळ जोडून आहेत याचे कौतुक वाटते. असेच प्रेम व साथ भविष्यात कायमस्वरूपी पाठीशी राहो माझे मंत्रीपद आपल्या तालुक्यातील, महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी व विकासासाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी केले.



 ना. शंभूराज देसाई यांची महाराष्ट्राचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री व सातारा आणि ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात वास्तव्याला असलेल्या पाटणच्या बंधू-भगिनींनी युवा नेते चंद्रकांत चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात नागरी सत्काराचे आयोजन केले होते.  

 यावेळी नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले, शिवसेना उपनेते विजय नाहटा, नवी मुंबई संपर्कप्रमुख किशोर पाटकर, सातारा जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, डॉ. दिलीप चव्हाण, सरपंच बाळकृष्ण काजारी, नवी मुंबईचे शिवसेना पदाधिकारी व पाटण तालुक्यातील मुंबई स्थित कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रकांत चाळके युवा मंचच्या वतीने या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तमाम पाटण तालुक्यातील मुंबई स्थित रहिवासी जनतेने नामदार शंभूराज देसाई यांचा भव्य नागरी सत्कार केला.

 यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ना. शंभूराज देसाई पुढे म्हणाले लोकनेते बाळासाहेब देसाई आणि वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्नेहाचे नाते होते. या दोन्ही महान नेत्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा जपण्यासाठी, पुढे नेण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यापासून सुरू झालेली लोकसेवेची, पाटणच्या विकासाची परंपरा यापुढेही कायम ठेवून पाटण तालुका राज्यात विकासाचे रोल मॉडेल करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

 मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी विश्वासाने सातारा आणि ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली असून त्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवू, असेही ते यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे पाटण मतदारसंघ आणि सातारा जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील युतीचे सरकार पाटणच्या, साताऱ्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास ना. शंभूराज देसाई यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.



 कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते चंद्रकांत चाळके यांनी केले यावेळी बोलताना ते म्हणाले शंभूराज देसाई साहेब आमदार असताना तालुक्यात कोट्यावधीची विकास कामे खेचून आणली आता तर ते राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत तर सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळे आपल्या तालुक्यासाठी, विभागासाठी विकासाचे फार मोठे पर्व उभे राहत आहे ही आपल्या तालुक्याच्या दृष्टीने खूप भाग्याची गोष्ट आहे. माझ्या चाळकेवाडी गावाने साहेबांना निवडणुकीत शंभर टक्के साथ दिली त्याची परतफेड म्हणून साहेबांनी काही दिवसातच पाच कोटीचा भरीव निधी गावात दिला व विकास म्हणजे काय हे सर्वांना दाखवून दिले. अशा विकास पर्व उभे करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे पाटण तालुक्यातील जनतेने खंबीरपणे पाठीशी उभे राहावे व आगामी काळात तालुक्यात होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत नामदार देसाई साहेब जो उमेदवार देतील त्या उमेदवारास बहुमताने निवडून आणून साहेबांचे हात आपणास बळकट करायचे आहेत. आजच्या या भव्य नागरी सत्काराने त्यांना आपण ग्वाहीच देऊया.

 पाटण तालुक्यातील काही सामान्य लोकांनी कल्याण क्षेत्रातील अटाळी-आंबिवली येथे राहण्यासाठी घरे घेतली होती मात्र या विभागातून जाणाऱ्या टिटवाळा ते दुर्गाडी रिंग रोड मध्ये आज त्यांची घरे उध्वस्त होणार आहेत येथील ८४५ रहिवाशांचे पुनर्वसन होऊन त्यांना न्याय द्यावा अशी आग्रही मागणी यावेळी चंद्रकांत चाळके यांनी ना. देसाई यांच्याकडे केली.

ना.शंभूराज देसाई सत्कार सोहळयास विष्णुदास भावे नाट्यगृह पदाधिकारी, शिवसेनिक व कार्यकर्त्यांनी खचाखच भरले होते. मोठ्या संख्येने शिवसैनिक तसेच पाटण तालुक्यातील मुंबई वाशीय उपस्थित होते.

सदर कार्यक्रम कमालीचा यशस्वी झाला. या निमित्ताने युवा नेते चंद्रकांत चाळके यांचे संघटन कौशल्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले.