स्पंदन ट्रस्ट तर्फे दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
दिवाळी अंक ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक परंपरा असून ती अखंडपणे चालू राहावी व यातून दर्जेदार साहित्याची निर्मिती व्हावी यासाठी ‘स्पंदन दिवाळी अंक स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे.

स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने यापूर्वी सामाजीक उपक्रमाबरोबर सुंदर किल्ले बनवा स्पर्धा,  सेल्फी विथ गुढी स्पर्धा, गणेशोत्सव उत्कृष्ट वार्तांकन स्पर्धा, नवरात्रोत्सव वार्तांकन स्पर्धा, सॅल्युट कार्ड स्पर्धा अशा विविध स्पर्धा राबवल्या आहेत.

या स्पर्धेबाबत संयोजक डाॅ.संदीप डाकवे म्हणाले, ‘‘दिवाळीच्या फराळासोबतच वाचकांना सकस साहित्याची मेजवानी देणाऱ्या दिवाळी अंकाचा, साहित्याचा गौरव करण्यासाठी स्पंदन दिवाळी अंक स्पर्धेचे चे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये दिवाळी अंकातील साहित्य, वैविध्य, मांडणी आणि छपाईचा दर्जा या संदर्भात गुणवत्तेच्या निकषावर सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकांना मान्यवरांच्या हस्ते गौरवपर सन्मानपत्र, आकर्षक स्मृतीचिन्ह प्रदान केली जातील. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व दिवाळी अंकांना सन्मानपत्र दिली जाणार आहेत.

स्पर्धेसाठी अधिकृतरित्या आलेल्या दिवाळी अंकामधूनच पुरस्कारांसाठी अंकांची निवड केली जाणार आहे. पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रांतील मान्यवर या स्पर्धेसाठी परीक्षक असतील. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. स्पर्धेत भाग घेण्यासाठी दिवाळी अंकाच्या तीन प्रती पाठवाव्यात. दिवाळी अंक स्पर्धेच्या निमित्ताने संग्रहित झालेल्या तीन दिवाळी अंकापैकी दोन अंक वाचनालयाला भेट देण्यात येणार आहेत.

तरी या स्पर्धेसाठी आपल्या दिवाळी अंकाच्या 3 प्रती सोमवार दि.04 नोव्हेंबर, 2021 पूर्वी डाॅ.संदीप राजाराम डाकवे मु.डाकेवाडी, पो.काळगांव, ता.पाटण, जि.सातारा. 415112, मो.9764061633 येथे पोस्टाने पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.