अभिनेते नाना पाटेकर यांची डाॅ.संदीप डाकवेंच्या पाठीवर कौतुकाची थाप; नानांना दिली 13000 वी कलाकृती


तळमावले | कृष्णकाठ वृत्तसेवा:
नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपलेल्या पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील डाॅ.संदीप डाकवेंनी सुप्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर यांना त्यांचे अनोखे पोट्रेट भेट दिले. डाॅ.डाकवे यांची भेट दिली जाणारी ही 13000 वी कलाकृती आहे. या भेटीप्रसंगी त्यांच्यासमवेत ‘सगाम’चे प्राचार्य डाॅ.मोहन राजमाने, ऍड. रविंद्र पाटील, विकास पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

विशेष म्हणजे या पोट्रेटमध्ये डाॅ.संदीप डाकवे यांनी नाना पाटेकरांनी भूमिका केलेल्या चित्रपटांची नावे, त्यांचे काही गाजलेले प्रसिध्द डायलाॅग तसेच त्यांचा थोडक्यात जीवनप्रवास रेखाटला आहे. अतिशय व्यस्त शेडयुल्डमधून नाना पाटेकर यांनी ही कलाकृती पाहिली. नानांनी डाॅ.डाकवेंच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत पाठीवर कौतुकाची थाप मारली.

दरम्यान डाॅ.डाकवे यांनी काॅलेजमध्ये असताना नानांची रेखाटलेली रांगोळी, हाफटोन मधील पोट्रेट ची प्रिंट दाखवली. तसेच नाम फाऊंडेशनला चि.स्पंदन याच्या वाढदिवसानिमित्त 35,000 रुपयाचा निधी दिल्याची माहितीही सांगितली. याशिवाय डाॅ.संदीप डाकवे यांनी स्पंदन ट्रस्टची कर्तव्यमुद्रा, प्रतिबिंब, माहितीपत्रक नाना पाटेकर यांना दिले.

यापूर्वी डाॅ.संदीप डाकवे यांनी 100 वी कलाकृती अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडीलकर, 500 वी पद्मश्री डाॅ.प्रकाश आमटे, 1000 वी अभिनेते भरत जाधव, 2000 वी अभिनेते सुबोध भावे, 3000 वी अभिनेत्री अश्विनी महांगडे, 4000 वी गायिका कविता राम, 5000 वी एसपी तेजस्वी सातपुते, 6000 वी पत्रकार हरीष पाटणे, 7000 वी एसपी अजयकुमार बन्सल, 8000 वी आरटीओ तेजस्विनी चोरगे, 9000 वी ज्योतिशविशारद सतीश तवटे, 10000 वी अभिनेता रोहन गुजर, 11111 वी कोल्हापूरचे मठाधिपती विद्यानृसिंह भारती, 12000 वी आदिमठाध्यक्ष धारेश्वर महाराज यांना दिल्या आहेत.

विविध समाजोपयोगी छंद जोपासत डाॅ.संदीप डाकवे यांनी गरजूंना मदत देखील केली आहे. नावीण्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या डाॅ.डाकवेंच्या नावाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ मध्ये तीनदा, वल्र्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड मध्ये दोनदा तर ‘हायरेंज बुक ऑफ रेकाॅर्ड’ मध्ये एकदा झाली आहे. नानांना दिलेले हे अनोखे पोट्रेट उपस्थितांनी आपल्या मोबाईलमध्ये साठवून ठेवले आणि त्यांनी डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.



कलेतून व्यावसायिकता जाण्याचा प्रयत्न :

विविध उपक्रमाच्या माध्यमातून डॉ. संदीप डाकवे यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने केलेल्या कामामुळे ‘स्पंदन’ हा ब्रॅंड संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये कलेतून व्यावसायिकता जपण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत संवेदनशील कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.