चक्क सुपारीवर साकारलं श्रीमहालक्ष्मीचं चित्र.


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

कलेत नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवत तब्बल 6 विश्वविक्रम स्वतःच्या नावावर केलेल्या पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी चक्क सुपारीवर कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीचे चित्र साकारले आहे. नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही अनोखी कलाकृती केली आहे.

श्री महालक्ष्मीचे चित्र सुपारीवर साकारत असताना त्यातील बारकावे, नक्षीकाम आणि चित्रावर विशेष परिश्रम घेवून चित्र साकारावे लागते. या सुक्ष्मदर्शी कलाविष्कारासाठी डाॅ.डाकवे यांनी अनेक तास खर्च केले आहेत.

शालेय जीवनापासून चित्रकलेचा छंद जोपासलेल्या डाॅ.संदीप डाकवे यांनी आतापर्यंत खडूवर अष्टविनायक, मोरपिसावर संत तुकाराम, राजश्री शाहू महाराज, जाळीदार पानावर श्री गणेश, 1 सेमी आकारामध्ये श्रीकृष्ण अशा कलाकृती केल्या आहेत. छोटया कलाकृतीसाठी विशेष ब्रशच्या वापराबरोबरच मोठी मेहनत घ्यावी लागते. आकाराने एकदम लहान असल्याने संयमाने विशेष काळजी घेवूनच या कलाकृती साकाराव्या लागल्या आहेत. चित्र काढत असताना अनेक तासाचा कालावधी लागतो. असे मत कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

कलाकृती करत असताना डाॅ.संदीप डाकवे यांना त्यांच्या घरच्यांचा देखील पाठिंबा आणि प्रोत्साहन मोठया प्रमाणात मिळत आहे. तसेच प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे, शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे, प्रा.ए.बी.कणसे, कलाशिक्षक बाळासाहेब कचरे, जयंत कदम, सुरेश जाधव, आई गयाबाई डाकवे, पत्नी सौ.रेश्मा डाकवे, चि.स्पंदन डाकवे हे नेहमीच विविध कलाकृती साकारण्यासाठी डाॅ.संदीप डाकवे यांना प्रोत्साहित करत असतात.

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुपारीवर साकारलेल्या श्री महालक्ष्मीच्या अनोख्या कलाकृतीची सर्वत्र चर्चा होत असून डाॅ.संदीप डाकवे यांचे सर्वजण कौतुक करत आहेत.