तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील सुप्रसिद्ध चित्रकार डॉ.संदीप डाकवेंचे वडील राजाराम डाकवे यांचे आकस्मिक निधन झाले. डाकवे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशातही त्यांनी एक अनोखा उपक्रम राबवून समाजासमोर आदर्शवत पायंडा पाडला आहे.
वडिलांच्या निधनानंतर रक्षा पाण्यात विसर्जित न करता त्यात वृक्षारोपण केले. डाकवे परिवाराने त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी आणि पर्यावरण जतन करण्याचा संदेश दिला. राजाराम डाकवे हे गावातील हरिनाम सप्ताह, विविध धार्मिक कार्यक्रम यात सक्रिय असायचे. सध्या डाकेवाडीमध्ये सुरू असलेल्या श्री दत्त मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यात त्यांनी हिरीहिरीने सहभाग घेतला होता.
राजाराम डाकवे उर्फ तात्या यांच्या अकाली निधनाने डाकेवाडीतील मार्गदर्शक, सेवाभावी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना यावेळी अनेक मान्यवरांनी बोलुन दाखवली.
आपल्या वडिलांनी कुटुंबासाठी केलेल्या काबाड कष्टाची जाणीव ठेवून त्यांच्या आठवणी चिरकाल राहण्यासाठी वडिलांचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर रक्षा नदीत विसर्जन न करता डाकवे परिवाराने शेतात आंबा, सीताफळ, पेरु इत्यादी झाडे लावली आहेत.
या वृक्षारोपणप्रसंगी डॉ.संदीप डाकवे, भरत डाकवे, विठ्ठल डाकवे, पांडुरंग डाकवे, ज्ञानदेव डाकवे, विश्वनाथ डाकवे, हरिबा डाकवे, लक्ष्मण डाकवे, सुनील मुटल, तेजस बोरगे, नितीन पाटील, अक्षय पाटील, विलास घारे, प्रमोद माने, भरत पाटील, सुरज शिंदे, अक्षय पाटील, अक्षय डाकवे, सागर डाकवे, अंकुश डाकवे, सुनील सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
"मरावे परी वृक्षा रुपी उरावे" असा संदेश देत डाकवे परिवाराने डाकेवाडीत प्रथमच राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.