बदलत्या काळाबरोबर विद्यार्थ्यांना सक्षम राहण्याचे उत्तेजन व प्रेरणा शिक्षकांनी द्यावी:- प्रा. ए. बी कणसे.

 


कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा:  

 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे शिक्षक दिन उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. ए. बी. कणसे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, बदलत्या काळाबरोबर विद्यार्थ्यांना सक्षम राहण्यासाठी शिक्षकांनी उत्तेजन व प्रेरणा द्यावी. 

 आज शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल झाला आहे. ज्ञान, तंत्रज्ञान याची वाढ झालेली आहे. येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत असताना विद्यार्थ्यांना काळाबरोबर बदलण्यासाठी शिक्षकाने परिश्रम घेतले पाहिजे. केवळ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा हे बोलून चालणार नाही तर कृतीतून शिक्षकाने करून दाखवले पाहिजे. विद्यार्थ्यांना ज्ञानसागरात डुबकी मारायची असेल तर शिक्षकाने देखील तितक्याच तन्मयतेने चौकटी बाहेर जाऊन ज्ञानसंपन्न असले पाहिजे. जगामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही. ती शक्य करता येते. परंतु यासाठी विद्यार्थ्यांना धाडसी बनवणे गरजेचे आहे. त्यांच्यातील नकारात्मकता संपवून शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांचे विचार सकारात्मक केले पाहिजे. शिक्षक हा माणूस घडवतो. गुरूंचा आशीर्वाद पाठीशी असतो. जो थांबला तो संपला या उक्तीप्रमाणे सतत गुरुंनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहून त्यांना पुढे जाण्याचे सहकार्य केले पाहिजे. महाविद्यालयीन शिक्षणाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. आज सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करीत आहोत. ही अभिमानाची गोष्ट आहे .आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो!!

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. महेश गायकवाड होते आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे हे आपले सर्वांचे श्रद्धास्थान व महान गुरु आहेत. त्यांनी सर्व शिक्षकांना कर्मचाऱ्यांना गुरुदेव कार्यकर्ता ही उपाधी दिली व सर्वांचा सन्मान केला. आई हा माणसाचा पहिला गुरु असतो. वर्गात शिक्षक हा दुसरा गुरु होतो तर सभोवतालचा समाज हाही माणसाला जगायला शिकवतो. त्यामुळे तो तिसरा गुरु ठरतो. आपल्या देशामध्ये अनेक महान व्यक्ती झाल्या त्यामध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन, ए .पी. जे. डॉ.अब्दुल कलाम इत्यादींचा समावेश होईल. वर्गातील विद्यार्थी नावाने लक्षात राहिला पाहिजे तसं पाहिलं तर विद्यार्थी हाच शिक्षकांचा सर्वात मोठा गुरु आहे कारण शिक्षकांनी काय करायचे? काय शिकवावे? कशी उत्तरे द्यावी? हे सर्व विद्यार्थी शिकवत असतो. मनाची अस्वस्थता, मनावर असलेला ताण, तणाव गुरुरूपी आई, शिक्षक, मित्र, विविध संदर्भ ग्रंथ दूर करत असतात. आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व गुरुजनांना मी शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो!!

     या कार्यक्रमासाठी जूनियर विभागाचे पर्यवेक्षक प्रा. सुरेश रजपूत, प्रा. अशोक खोत सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शिक्षक दिनाच्या निमित्ताने इतिहास विभाग प्रमुख प्रा. सचिन बोलाईकर, जूनियर विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सुरेश यादव, विद्यार्थिनी सानिका, यांनी आपली मनोगते व्यक्त केली. गेल्या शैक्षणिक वर्षात ज्या शिक्षकांनी विविध क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केले त्या सर्वांचा शिक्षक दिनाच्या निमित्ताने ग्रंथ व लेखणी देऊन प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सुभाष कांबळे यांनी केला. आभार प्रा. संभाजी पाटील यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन प्रा शोभा लोहार यांनी केले.