स्वत:ला घडवण्यासाठी प्रयत्न करा. तांबव्यात महिला उद्योगिनी मेळाव्यास उदंड प्रतिसाद.

कराड |कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

धडपड करा, आपल्याला मार्ग सापडतील, त्या मार्गावरुन चालायला सुरुवात केली तर आणखी मार्ग सापडतात. स्वत:ला कमी लेखू नका. स्वत:ला बदलण्यासाठी, घडवण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला उद्योजिका माई साळुंखे, दीपा काटदरे, दीपाली भागवत यांनी महिलांना दिला. 

तांबवे, ता. कराड येथे स्व. सौ. सुशीला पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्ताने स्व. सौ. सुशीला ज्ञानदेव पाटील बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने तांबवे येथे महिला उद्योगिनी मेळावा आणि बचत गट स्टॉल व विक्री प्रदर्शनाचे आयोजन केले होते. मेळाव्याचे उद्घाटन गटविकास अधिकारी मीना साळुंखे, कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक रेखा दूधभाते यांच्या हस्ते झाले. मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून संगीता साळुंखे (माई), काटदरे फूड प्रॉडक्टसच्या संचालिका दीपा काटदरे, श्री साई सेवा पॅकिजिंगच्या प्रमुख दीपाली भागवत तसेच संस्थेच्या अध्यक्षा नयना पाटील- खबाले, विश्वस्त व मान्यवर उपस्थित होते. मेळाव्यास महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. 

दरम्यान, बचत गटांच्या स्टॉल व विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रदीप पाटील, विजया पाटील, उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील, पाटण अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन धनंजय ताटे, सह्याद्री कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील, शंकर पाटील यांच्या हस्ते झाले.

माई साळुंखे म्हणाल्या, स्व. सुशीला पाटील परिस होत्या, त्यांच्या सहवासात कोणी येत होत्या त्यांचे सोने होत होते. स्वाध्याय परिवारातून त्या आयुष्यभर झिजल्या. सुशीला म्हणजे चारित्र्यसंपन्न. त्यांनी लेकरांनाच नव्हे तर समाजातील अनेकांना संस्कार, कतृर्त्वसंपन्न बनवले. स्व. सुशीला पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने महिलांना सक्षम करण्यासाठी महिला उद्योगिनी मेळावा आयोजित केला आहे. या माऊलीचे स्मरण रहावे, यासाठी राबवत असलेले उपक्रम स्तुत्य आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वच स्तरावर अशा प्रकारे प्रयत्न होणे अपेक्षित आहे.

बचत गटातून एकत्रित यावे आणि बचत करावी हा उद्देश नाही. एकत्रित येवून विचारांची आदान प्रदान करुन त्यातून व्यवसाय उभारावा आणि सर्वांना आर्थिक सक्षम करावे, हा बचतगटांचा उद्देश असल्याचे माई साळुंखे यांनी सांगितले. 

दीपा काटकरे म्हणाल्या, व्यवसायाशी आपण प्रामाणिक राहिलो पाहिजे. व्यवसायातून येणारा पैसा उधळपट्टी न करता तो व्यवसायात वापरायला हवा. उद्योग, व्यवसाय वाढण्यासाठी मार्केटिंग अत्यंत आवश्यक आहे. जे उत्पादन आहे त्याचा ग्राहक कोण असणार, याचा अभ्यास करुन पावले उचलावीत. आर्थिक शिस्त पाळली पाहिजे. 

 दीपाली भागवत म्हणाल्या, ग्रामीण भागातील महिलांमध्ये एकी आहे. बचत गटांच्या माध्यमातून अनेक व्यवसाय करता येतात. हे करताना आपली एकी तुटून द्यायची नाही. त्या एकीचा उपयोग व्यवसाय वाढीसाठी केला पाहिजे. 

मीना साळुंखे म्हणाल्या, ग्रामीण भागातील महिलांनी मर्यादीत न राहता आधुनिक पध्दतीने उत्पादने घ्यावीत. बचतगटाद्वारे व्यवसाय करुन स्वत:बरोबर इतरांची कुटुंबेही आर्थिक सक्षम करावीत. बाजारपेठेतील नवनवीन संकल्पनांचा अभ्यास करुन त्याद्वारे बाजारपेठेत स्थान मिळावावे. हा महिला उद्योगिनी मिळावा अत्यंत स्तुत्य असून, त्या संधी मिळाली, हे माझे भाग्य समजते.

रेखा दूधभाते म्हणाल्या, प्रत्येक महिलांमध्ये गुण आहेत. समाज काय म्हणेल याचा विचार न करता व्यवसाय करा. स्वत:ला कमी लेखू नका. बचतगट सुरु असताना दक्ष राहून त्याचे कामकाज करा. गैरप्रकार, फसवणूक होवू नये, याची काळजी घ्या. 

यावेळी यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आई अंजना यांचा तसेच तांबवे येथील पहिले शहिद जवान कृष्णराव पवार यांच्या पत्नी श्रीमती सुरेखा पवार यांचा सन्मान करण्यात आला. शिवाय, ४० महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.

प्रास्ताविक नयना खबाले पाटील तर आभार अंकिता कदम यांनी मानले.

______________________________

लाखात उलाढाल.

बचत गट स्टॉल व विक्री प्रदर्शनात कराड तालुक्यातील तब्बल ४० हून अधिक बचतगट सहभागी झाले होते. यात खाद्यपदार्थ, मसाले, कापडे, ज्वेलरी, लाकडी खेळणी, आयुर्वेदिक औषधे, शोभेच्या वस्तू, दुचाकी विक्री आदींचे स्टॉल सहभागी होते. यात एका दुचाकीची विक्री झाली. शिवाय, बचत गटांच्या उत्पादनांचीही मोठ्या प्रमाणात विक्री होवून लाखात उलाढाल झाली.

______________________________

यशस्वीतेचे मंत्र...

संगीता साळुंखे : बचतगटानी पारदर्शक, समजून व्यवसाय करावा

दीपा काटदरे : उद्योग, व्यवसाय वाढण्यासाठी मार्केटिंग आवश्यक

दीपाली भागवत : एकीचा उपयोग व्यवसाय वाढीसाठी करा

मीना साळुंखे : बाजारपेठेत स्वत:चा नवा ट्रेंड निर्माण करा

रेखा दूधभाते : स्व:तातील गुण ओळखून व्यवसाय करा.

______________________________