राज्यातून २ लाख युवकांचे डिग्री सर्टिफिकेट मोदींना पाठवणार - शिवराज मोरे

नरेंद्र मोदींचा वाढदिवस राज्यभर "बेरोजगार दिन" म्हणून साजरा कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला पळवल्याच्या विरोधात आज युवक काँग्रेसने कराड शहरातील रस्त्यावर उतरत आंदोलन केले. २ कोटी रोजगार देणार अशा घोषणा करणाऱ्या मोदींनी महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग जर गुजरातला पळवले तर महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांनी करायचं काय ? त्यापेक्षा आम्ही अभ्यास करून मिळविलेले डिग्री सर्टिफिकेट तुम्हालाच पाठवून देतो असे परखड वक्तव्य यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस राज्यभर आज मोदींचा वाढदिवस "बेरोजगार दिन" म्हणून साजरा करत आहे. याचाच एक भाग म्हणून कराडमध्ये आंदोलन केले जात आहे. 

या निर्णय विरोधात आंदोलन करणार असून राज्यातून २ लाख युवकांच्या डिग्री सर्टिफिकेट मोदींना पाठवणार असल्याचे यावेळी शिवराज मोरे यांनी सांगितले. यावेळी युवक काँग्रेसचे अमित जाधव, दिग्विजय पाटील, शिवराज पवार, अमोल नलवडे, दिग्विजय सूर्यवंशी , प्रकाश पिसाळ, अभिजीत पाटील, महेश पवार, गणेश सातारकर, मोबीन बागवान, गणेश गायकवाड, मुकुंद पाटील , आदित्य कुडाळकर ओंकार चव्हाण, अब्रार मुजावर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

तसेच पुढे शिवराज मोरे म्हणाले कि, केंद्रातील मोदी सरकारच्या दबावाला बळी पडून राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारने 1 लाख 58 हजार कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला घालविला. या विरोधात आम्ही युवक आंदोलन करत आहोत. वेंदाता-फॉक्सकॉन प्रकल्प पुण्यातील तळेगाव येथे होणार हे ठरले होते. गुजरातपेक्षा चांगलं वातावरण महाराष्ट्रात असताना राजकीय दबावापोटी हा प्रकल्प गुजरातला नेला गेला. महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार परराज्यात गेला याला सर्वस्वी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार आहे.