लम्पी त्वचारोगाचा धोका वाढल्याने शेतकऱ्यांनी जनावरांचे लसीकरण करावे. खा. श्रीनिवास पाटील

 

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

    राज्यात जनावरांमधील लम्पी त्वचारोगाचा धोका वाढल्याने पशू पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी जनावरांचे लसीकरण करावे. लसीचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करावा. तसेच या अनुशंगाने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री पुरूषोत्तम रूपाला आणि राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना पत्राद्वारे केली आहे. 

     याबाबत खा.श्रीनिवास पाटील यांनी पत्र लिहले असून त्यात म्हटले आहे, देशातील राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली व महाराष्ट्र या राज्यात पशुधनामध्ये लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. लम्पी त्वचारोग हा केवळ गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आपल्या जनावरांना होऊ नये म्हणून लस उपलब्ध व्हावी यासाठी शेतकरी प्रतिक्षेत आहेत. 

     सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यातील खामगांव, जिंती, फडतरवाडी, चव्हाणवाडी व सातारा तालुक्यातील महागांव, कोडोली पांढरवाडी, खटाव तालुक्यात अनपटवाडी व मानेवस्ती, कराड तालुक्यात वाघेरी अशा नऊ गावात लागण झाली आहे. हा संसर्गजन्य रोग असल्याने रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे महत्वाचे आहे. 

     काही कारणाने नजिकच्या काळात जर या रोगाचा प्रादुर्भाव राज्यामध्ये वाढल्यास त्यादृष्टीने आत्तापासूनच प्रशासन सज्ज असायला हवे. त्याचाच एक भाग म्हणून सर्व गोवंश जनावरांचे लसीकरण करता येणे शक्य झाले पाहिजे, त्याबाबत कार्यवाही व्हायला हवी. पशुमालकांना भेटून शेतक-यांमध्येे निर्माण झालेली भीती दूर करण्याचे प्रयत्न संबंधित विभागाने केले पाहिजेत. ज्या गावांमध्ये प्रादुर्भाव जास्त आहे त्या गावात पशुवैद्यकीय अधिका-यांनी सदर गावांमध्ये जावून जनावरांची संख्या लक्षात घेवून त्वरेने जनावरांचे लसीकरण केले पाहिजे. त्यासाठी आपण संबंधित सर्वच अधिका-यांना सतर्क राहण्याच्या सूचना कराव्यात. लम्पी त्वचारोगाचा फैलाव राज्यात वाढू नये यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी मागणी खा.पाटील यांनी केली आहे.