संस्था नजीकच्या काळात 100 कोटी ठेवींचा टप्पा पार करेल : चेअरमन अभिजीत पाटील

आनंदराव चव्हाण व जागेश्वरी महिला पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्नढेबेवाडी : संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना चेअरमन अभिजीत पाटील समवेत संचालक मंडळ.

ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

पारदर्शक कारभार, सभासद व ठेवीदारांचा विश्वास यामुळे आनंदराव चव्हाण पतसंस्था भक्कमपणे उभी आहे. पतसंस्थेने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळवला असून संस्थेने आर्थिक वर्षात १२९.३३ कोटीची उलाढाल केली आहे. तसेच भविष्यात १०० कोटी ठेवीचे उद्दिष्ट असून आगामी काळात ते पूर्ण होईल, असा विश्वास संस्थेचे चेअरमन अभिजित पाटील यांनी व्यक्त केला.

ढेबेवाडी (ता. पाटण) येथील आनंदराव चव्हाण सहकारी पतसंस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि जोगेश्वरी महिला पतसंस्थेची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ढेबेवाडी येथील भाग्यश्री मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे संस्थापक हिंदुराव पाटील, व्हाईस चेअरमन आर. बी. पाटील, जोगेश्वरी महिला पतसंस्थेच्या चेअरमन मंदाकिनी पाटील, व्हाईस चेअरमन अश्विनी पाटील, सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.

 संस्थेचे चेअरमन अभिजित पाटील म्हणाले संस्थेने सहकार कायद्याचे नियम व शासनाने वेळोवेळी घातलेल्या निर्बंधांचे काटेकोर पालन करून स्वतःचे डाटा सेंटर उभे केले आहे. सर्व शाखा कोअर बँकिंग प्रणाली वापरून ग्राहकांना सेवा देत आहेत. मोबाईल ॲप व क्यूआर कोड, संस्थेचे एटीएम कार्डस् सोय उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत असेही अभिजित पाटील यांनी सांगितले.


 या  वेळी बोलताना संस्थेचे संस्थापक हिंदुराव पाटील म्हणाले की अडचणीच्या काळात पतसंस्थेची स्थापना करून सर्वसामान्य जनतेची गेली २८ वर्षे सेवा करत आहे. त्यामुळे संस्थेने वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. अभिजित पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांवर टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ करून दाखवला आहे. त्याचाच परिपाक म्हणजे संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम बनली आहे.

प्रास्ताविक व स्वागत संजय लोहार यांनी केले. अहवाल वाचन व्यवस्थापक सुहासचंद्र पाटील व दादासो साळुंखे यांनी केले. तर आर. बी. पाटील यांनी आभार मानले. यावेळी सभासद, ठेवीदार, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

______________________________

संस्थेच्या ठेवी : ७६ कोटी ४६ लाख

कर्जे ५२ कोटी : ८६ लाख 8

संस्थेची गुंतवणूक : १८ कोटी २९ लाख

भागभांडवल : २ कोटी ६४ लाख ८९ हजार,

बँक बॅल्नस व शिल्लक : ४ कोटी ४० लाख

एकत्रीत व्यवसाय : १२९ कोटी ३३ लाख

लाभांश ५% टक्के
______________________________