‘आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा म्हणजे राष्ट्रवादी व काँग्रेस पुरस्कृत’. शंभुराज देसाईंचा टोला..


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेचं संघटन मजबूत करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रा काढत आहेत. आदित्य ठाकरे यांनी आज माजी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघात यात्रा काढली. शंभुराज देसाई यांनी या यात्रेवर जोरदार टीका केलीय. आदित्य ठाकरेंची ही निष्ठा यात्रा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुरस्कृत असल्याचा टोला त्यांनी लगावलाय. तसंच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर पहिल्यांदाच भगवा झेंडा दिसला याचं समाधान आहे, असा खोचक टोलाही देसाई यांनी लगावलाय.

शंभुराज देसाई म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुरस्कृत आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा आहे. माझे विरोधक, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आदित्य ठाकरेंच्या सभेला आणण्यात आले होते. काहीही असो पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात पहिल्यांदा भगवा रुमाल दिसला. ज्या नेत्यांना स्वत:च्या मतदारसंघात थोडी मतं मिळतात ते लोक आज माझ्या मतदारसंघात येऊन मला हरवण्याच्या गोष्टी करत आहेत, असा टोला शंभुराज देसाई यांनी जिल्ह्यातील विरोधकांना लगावलाय.

आम्ही गद्दार नाही. बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहोत. मागील वेळी तुम्हीच आम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसवलं होतं. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना बाजूला ठेवलं होतं, अशी टीकाही शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंवर केलीय. 

मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली आहे. ते जेव्हा येतील तेव्हा आजच्या पेक्षा 100 पट जास्त लोक कार्यक्रमाला असतील, हे मी त्यांना दाखवून देईन, असा विश्वासही शंभूराज देसाई यांनी यावेळी व्यक्त केला आहे.