अन् ऊर अभिमानानं भरुन आला....


यंदा आपला देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. आपल्या देशाचा तिरंगा ध्वज पाहिला तरी ऊर गर्वाने भरुन येतो. तिरंग्याकडे पाहिल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले बलिदान देणारे क्रांतीकारक, थोर स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक यांची आठवण आल्यावाचुन राहत नाही. त्यामुळेच मी यंदा निवडक 75 सेनांनींची रेखाचित्रे रेखाटण्याचा संकल्प करुन तो पूर्ण केला. यापूर्वीही स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून एक दिवा जवानांसाठी, कॅलिग्राफीतून जवानांना शुभेच्छा, सॅल्युट कार्ड स्पर्धा, कर्नल संतोष महाडीक यांचे हस्तलिखित, एक अक्षरगणेशा हुतात्मा जवानांसाठी असे उपक्रम राबवले आहेत. त्या माध्यमातून आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीज, भारत के वीर, माजी सैनिक यांना मदतनिधी दिला आहे.

शाळेमध्ये 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी या कार्यक्रमादिवशी होणारे संचलन, बॅंड पथक वाजवणारे, सलामी देणारे विद्यार्थी तसेच त्यांची सलामी स्वीकारणारे प्रमुख पाहुणे मी अनेकदा पाहिले आहेत. आपणालाही अशा पध्दतीने झेंडा फडकवण्याचा मान मिळावा असे मनातून राहून राहून वाटायचे. एकदा एका शाळेच्या कार्यक्रमाला मला तसे निमंत्रितही केले होते पण मला जाता आले नाही त्यावेळी खूप वाईट वाटले. बरेच दिवस हे शल्य मनात बोचत राहिले होते.

स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेली काही वर्षापासून मी समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. वृत्तमानपत्रे, सोशल मिडीया व अन्य माध्यमातून ते लेाकांपर्यंत पोहोचत देखील आहेत. त्याची दखल समाजाने अनेकदा घेतली आहे. अनेक ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून यथोचित सन्मान देखील केला आहे. अनेक संस्थांनी पुरस्कार दिले आहेत. याचाच एक भाग म्हणून की काय भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त झेंडा फडकवण्याचा मान मला मिळाला. तो मान सुभेदार मेजर शंकर जाधव व देशाचे भावी सैनिक असलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत. श्री समर्थकृपा अॅकॅडमी मारुल हवेली ता.पाटण, जि.सातारा येथे हा सन्मान मिळाला.

या अॅकॅडमीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात मला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले. कार्यक्रमात ज्यावेळी आदित्य जाधव यानी मला अॅकॅडमीच्यावतीने ध्वजारोहण करण्याची विनंती केली त्यावेळी अंगावर अक्षरशः रोमांच आले. ऊर अभिमानाने भरुन आला. छाती गर्वाने फुगुन गेली.

यानंतर अॅकॅडमीच्यावतीने माझा सत्कार करण्यात आला. यावेळी मी छोटेखानी मनोगत व्यक्त केले. हे क्षण मी माझ्या आयुष्यात काळजाच्या कप्प्यात जपून ठेवत आहेत. दरम्यान, मी अॅकॅडमीचे सुभेदार मेजर शंकर जाधव, आदित्य जाधव, साक्षी जाधव, सुवर्णा जाधव, फिजिकल ट्रेनर विजय केंद्रे, प्रथमेश शिंदे व इतर मान्यवर यांचा अक्षरगणेशा तयार करुन त्यांना भेट दिला. यावेळी उपस्थित मुलांनी केलेला जल्लोष हा मला मोठा अवॉर्ड मिळाल्याचा आनंद देवून गेला.

या संपूर्ण कार्यक्रमासाठी अडूळ येथील आमचे मित्र आणि सामाजिक कार्यकर्ते धनंजय केंडे उर्फ डीके यांचे मी मनापासून आभार मानतो. कारण त्यांनी हा योग घडवून आणला. कार्यक्रमात योग्य तो मानसन्मान आणि मला नेणे आणि आणण्यासाठी गाडीची व्यवस्था केली होती त्यांच्या ऋणात राहणे मी पसंत करेन.

भावी सैनिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहन करण्याची मला मिळालेली संधी मला मोठा अभिमान देवून गेली. विशेष म्हणजे हे अनमोल क्षण लेखक दिग्दर्शक जितेंद्र पवार यांच्या "गाववाडी प्रोडक्शन" प्रस्तुत "गावठी मॅटर" या ग्रामीण भागातील लोकप्रिय अशा वेबसिरीजमध्ये घेण्यात येणार आहेत. हा आणखी एक भाग्याचा क्षण ठरला आहे. एकंदिरत हा दिवस मला खूप भारावून टाकणारा आणि नवीन ऊर्जा देणारा गेला.

पुनश्चः श्री समर्थ कृपा अॅकॅडमी संपूर्ण जाधव परिवार, सामाजिक कार्यकर्ते धनंजय केंडे ऊर्फ डीके, बाजीराव पवार, अनिल देसाई, गावठी मॅटर वेबसिरीज टीम यांचेही या निमित्ताने आभार मानतो. जय हिंद...!