कराड शहरात तिरंगा पदयात्रेचे आयोजन : आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे कराड शहरवासीयांना आवाहन

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कराड शहरात "तिरंगा पदयात्रेचे" आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास चित्ररथांमधून मांडला जाणार आहे. हि पदयात्रा 15 ऑगस्ट 2022 रोजी तहसील कार्यालय येथून संध्याकाळी 4 वाजता निघणार असून या यात्रेचा समारोप कराड नगरपालिका येथील चौकात होणार आहे. तरी शहरातील नागरिकांनी या तिरंगा यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. 

यावर्षी स्वातंत्र्य लढ्याचा अमृत महोत्सव आपण तिरंगा यात्रेने साजरा करीत आहोत. 9 ऑगस्ट या दिवसाला आपल्या देशात अनन्य साधारण महत्व आहे. कारण यादिवशीच 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथील गोवालिया टॅंक येथून महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना "चले जाव" ची निर्णायक हाक दिली. यामुळे या दिवसाला क्रांतीदिन म्हणून ओळखले जाते. या दिवसापासून पुढे स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा निर्णायक लढा चालूच राहिला. या लढ्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांचा जाज्वल्य इतिहास आजच्या पिढीला समजणें गरजेचे आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनी स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान सांगण्याची संधी मिळत आहे. आपल्या पूर्वज्यांचे आभार मानण्याचा हा दिवस आहे. ज्यांच्यामुळे आपल्याला ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेपासून मुक्तता मिळाली. त्यांच्या आठवणी जागविण्याचा हा दिवस आहे. या पदयात्रेच्या निमित्ताने जो विचार आपण घराघरात पोहचवीत आहोत तो स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास आणि विचार आपण कायम जपला तरच ती खरी श्रद्धांजली स्वातंत्र्य सेनानीना राहील. आज स्वतंत्र भारतातील युवा पिढीने स्वातंत्र्य उपभोगताना इंग्रजांच्या गुलामगिरीतून क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य मिळविताना ज्या वेदना सहन केल्या, जो त्याग केला आहे तो जाणून घेणे गरजेचे आहे.

स्वातंत्र्य संग्रामात १८५७ पासून जो क्रांतिकारी लढा उभारला गेला तेव्हापासून भारत स्वतंत्र होईपर्यंत जे स्वातंत्र्य सेनानी शहीद झाले अशा स्वातंत्र्य सेनानींच्या पराक्रमाच्या आठवणी जागविण्याची गरज असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.