न्यू इंग्लिश स्कूल, काळगांव मध्ये शाळेत असताना मैदानावर, शाळा सुटताना किंवा भरताना सचिन कधीतरी दिसायचा. त्यानंतर तो मुंबईला गेला. बरेच वर्षे संपर्क झाला नाही. शाळेनंतर त्याने सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या भागातील युवकांच्या समस्या जाणून घेणे. त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे यातून सचिनचा प्रवास सचिनभाऊ आचरे असा झाला.
शिवसेना पाटण तालुका प्रमुख म्हणून त्याने आपल्या राजकीय क्षेत्राला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. परंतू मातृभूमी गाव असले तरी कर्मभूमी मुंबई त्यांना सारखी खुणावत होती. यातूनच त्यांनी मुंबई या ठिकाणी आपल्या राजकीय कामाला सुरुवात केली. साहजिकच गावची ओढ थोडी कमी झाली. त्यानंतर युवकांच्या गळयातील ताईत असलेले राजसाहेब ठाकरे यांच्या "कृष्णकुंज"वर आपल्या भागातील अनेक तरुणांना घेवून मनसेचा झेंडा हाती घेतला. एका सामान्य कुटूंबातील मुलगा कोणत्याही राजकीय वरदहस्ताशिवाय थेट एखाद्या पक्षप्रमुखाकडे जातो ही गोष्ट माझ्या मनाला भावून गेली म्हणून त्यांचे कौतुक करण्यासाठी ही शब्दफुलांची ओंजळ....
आचरेवाडी ग्रामपंचायत, काळगांव सोसायटी मध्ये त्यांनी आपल्या सहकार्यांचे नशीब आजमावले. यावेळी त्यांना युवकांनी दिलेला प्रतिसाद खूप छान होता. त्यानंतर अनेक दिग्गजांच्या समोर त्यांनी पंचायत समिती निवडणूक लढवली. यावेळी देखील तरुणाईने दिलेला प्रतिसाद प्रस्थापितांना विचार करायला लावणारा होता.
नवी मुंबई येथे पक्षाच्या संपर्क कार्यालयासाठी थेट मनसे नेते राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे, गजानन काळे व अन्य अशा दिग्गजांना उद्घाटनासाठी बोलावून आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप उमटवून दिली. नुकत्याच काळगांव सोसायटीमध्ये तब्बल 15 वर्षानंतर झालेल्या सत्तांतरामध्ये सचिन भाऊ आचरे खऱ्या अर्थाने ‘‘किंगमेकर’’ ठरले आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत हातामध्ये शिवबंधन बांधून पुन्हा एकदा ते शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. शिवसेना-मनसे आणि पुन्हा शिवसेना असा पक्ष प्रवास झालेल्या सचिन भाऊ आचरे यांनी आता युवकांच्या प्रश्नांबरोबरच भागातील लोकांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडवण्यासाठी तडफेेने प्रयत्न केल्यास येणारा काळ त्यांच्या साठी उज्ज्वल असेल. ग्रामीण भागातील एक तरुण थेट मोठया पक्षाच्या पक्षप्रमुखाकडे जातो ही गोष्ट आज मनाला भावली असल्यामुळेच हा लेखनप्रपंच....
सचिन भाऊ आचरे यांना काम करण्यासाठी भरपूर वाव आहे. भविष्यात त्यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात उदंड यश मिळवावे. विशेष म्हणजे तरुणाई त्यांच्या पाठीमागे आहे. त्यांना भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...!
डाॅ.संदीप डाकवे