इथून पुढे यांच्या नावाचे पुरस्कार कोणाला द्यायचे हो...!१३ ॲागस्ट २०२२ म्हणजे शनिवारी आचार्य अत्रे यांची १२४ वी जयंती. १३ ॲागस्ट १८९८ हा त्यांचा जन्मदिवस १३ ॲागस्ट १९९८ ला जन्मशताब्दी वर्ष साजरे केले गेले. वरळीच्या चौकात आचार्य अत्रे यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभा राहिला. त्याचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. त्यावेळचे सांस्कृतिक कार्य मंत्री प्रमोद नवलकर यांच्या पुढाकाराने हा पुतळा उभा राहिला. बाळासाहेब ठाकरे, त्यांची शिवसेना आणि आचार्य अत्रे यांच्यात उभा वाद होता. शिवसेना निर्माण करावी, हा आग्रह अत्रेसाहेबांचाच होता. संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू असतानाच १९५९ साली दैनिक मराठाचे मुख्य शिर्षक ‘महाराष्ट्रात शिवसेना उभारा’ हे अत्रेसाहेबांच्या लेखणीतून उतरलेले होते. अग्रलेखही त्यांनीच लिहिला होता. पुढे १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र झाला. १३ ॲागस्ट १९६० ला म्हणजे अत्रेसाहेबांच्या वाढदिवसाच्याच दिवशी ‘मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले. ठाकरे आणि अत्रे कुटुंबीयांचे असे संबंध. पण हे संबंध पुढे बिघडले... अत्रेसाहेब १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत मध्य-मुंबई लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना प्रखर विरोध केला. अवघ्या ६००० मतांनी अत्रेसाहेब पराभूत झाले. शिवसेनेने पाठिंबा दिला असता तर अत्रेसाहेब खासदार झाले असते. पण ते होणे नव्हते. साहेबांना दिल्लीतून ‘व्हाईस अॅाफ महाराष्ट्र’ हे इंग्रजी दैनिक काढायचे होते. पण ते ही होणे नव्हते. बिघडलेल्या संबंध अत्रेसाहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कायमच होते. पण नंतर बाळासाहेबांना आतून कुठेतरी वाटत राहिले की... एवढे ताणायला नको होते.... १९९५ साली युतीचे सरकार महाराष्ट्रात आले.. प्रमोद नवलकर हा उमदा सांस्कृतिक कार्यमंत्री झाला. नवलकर हे मूळातले पत्रकार, ‘भटक्याची भ्रमंती’ हे त्यांचे गाजलेले सदर . त्यांनी पुढाकार घेतला आणि अत्रेसाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहिला. आज वरळीच्या नाक्यावर हा पुतळा उभा आहे. मेट्रोचे जाळे मुंबईत पसरले तेव्हा वरळीवरून जाणाऱ्या मेट्रोसाठी हा पुतळा हलवायचे ठरवले होते. परंतु त्यावेळच्या मेट्रोप्रमुख अश्वीनी भिडे यांनी मार्ग काढला.... पुतळ्याच्या बाजूने मेट्रोचा मार्ग गेला. आणि वरळीच्या मेट्रो स्टेशनला ‘आचार्य अत्रे स्टेशन’ असे नावही दिले गेले आहे. आता ही मेट्रो जेव्हा सुरू होईल तेव्हा ती रिकमी धाओ किंवा भरलेली.. अत्रेसाहेबांचे नाव वरळी स्टेशनला दिले गेले आहे. हा पुतळा आणि रेल्वे स्टेशनचे नाव ही मुंबईतील अत्रेसाहेबांची आजची स्मारकं, असं म्हणायला हवं. ज्यांच्या वाणीने, लेखणीने रक्त ओकणाऱ्या तुफानी भाषणांनी संयुक्त महाराष्ट्राचे राज्य खेचून आणले त्या अत्रेसाहेबांना महाराष्ट्र जवळपास विसरला आहे. १३ जून १९६९ ला अत्रेसाहेब गेले. मला त्यांच्या सहवासात तब्बल एक तप राहता आले. त्यांच्यासोबत वावरता आले.... प्रवास करता आला... त्यांच्या ३०० सभा कव्हर करता आल्या... मिडास राजाच्या स्पर्शाने हात लावील त्याचं सोनं होतं.... असं सांगितलं जातं... ते बघायला कोणी गेलेले नाही. पण, अत्रेसाहेबांच्या स्पर्शाने एका २० वर्षांच्या तरुणाच्या आयुष्याचे सोने झाले, हे मी सांगू शकतो. साहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत होतो. अगदी रुग्णालयातसुद्धा... साहेबांच्या जाण्यानंतर शिरीषताई पै आणि व्यंकटेश पै यांनी हिमतीने सहा वर्षे ‘मराठा’ त्याच ताकदीने चालवला. पण कुणाचीतरी दृष्ट लागली. कामगारांचा संप घडवला गेला... खोटो मृत्यूपत्र झाले... कोर्ट- कचेऱ्या झाल्या. आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती करणारा एक प्रचंड वणवा शांत झाला. १९७१-७२ पासून आचार्य अत्रे फाऊंडेशनतर्फे ‘साहित्यसम्राट आचार्य अत्रे पुरस्कार’ सुरू करण्यात आला. संस्थेचे नाव नंतर बदलले. दरम्यान व्यंकटेश पै, शिरीष पै यांचेही दु:खद निधन झाले. आता त्यांचे नातू ॲड. राजेंद्र पै, ॲड. विक्रम पै, ‘आत्रेय’ फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार प्रदान समारंभ करून साहेबांची आठवण जागी ठेवतात. गेली अनेक वर्षे हा नामवंत पुरस्कार अनेक दिग्गजांना दिला गेला. अत्रेसाहेब कवी होते... विडंबन कवी होते. नाटककार होते.... चित्रपट निर्माते होते... पत्रकार होते... वक्ते होते... नेते होते... आमदार होते... काय नव्हते? एका आचार्य अत्रे यांच्यामध्ये १० अत्रे दडलेले होते. सगळ्या विषयांत त्यांचा प्रचंड आवाका होता. प्रस्तावनाकार म्हणून ते थक्क करणारे होते. कवी बी. यांच्या (मुरलीधर गुप्ते) ‘फुलांची ओंजळ’ या काव्यसंग्रहात जेमतेम ६० कविता आहेत. गाजलेली आणि लताबाईंनी गायलेली ‘चाफा बोलेना’ ही त्यातलीच कविता. या काव्यसंग्रहाला अत्रेसाहेबांची ७६ पानांची प्रस्तावना आहे. अमरशेख यांच्या ‘कलश’ काव्यसंग्रहाला ३० पानांची प्रस्तावना आहे. तर असे हे अत्रेसाहेब यांच्या नावाचा पुरस्कार द्यायचा... ज्याला पुरस्कार द्यायचा तशा तोडीचा माणूस शोधताना दमछाक व्हायला लागली. नवीन पिढीला माहिती नाही.... मराठी चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक एकदाच मिळाले. आणि ते अत्रेसाहेबांनी निर्मिती केलेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाला. त्या स्पर्धेसाठी तीन चित्रपट होते. ‘दो बिघा जमीन’ (दिग्दर्शक : बिमल रॅाय), ‘झाशी की रानी’ (दिग्दर्शक : सोहराब मोदी) आणि ‘श्मामची आई’(निर्मिती, दिग्दर्शन : आचार्य अत्रे). सात परिक्षक होते. एकही परिक्षक मराठी समजणारा नव्हता. दोन बंगाली, एक उडीया, चार उत्तर भारतीय... आणि त्यांनी राष्ट्रपती पुरस्काराची शिफारस केली ती ‘श्यामची आई’ चित्रपटाला. त्यावेळचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी सुवर्णपदक अत्रेसाहेबांच्या गळ्यात घातले... आणि इकडे मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये शिरीषताईंनी पुत्ररत्नाला जन्म दिला. गळ्यात घातलेले पदक घेवून अत्रेसाहेब दिल्लीहून मुंबईला आले.  

विमानतळावरून थेट हॉस्पिटलला गेले. छोट्या बाळाच्या गळ्यात राष्ट्रपतींचे ते पदक घातले. आणि बारसे होण्यापूर्वीच त्याचे नाव ठेवले... ‘राजेंद्रप्रसाद’ तेच आजचे ॲड. राजेंद्र पै. या परिवाराच्या सातत्यामुळे गेली ५० वर्षे हा पुरस्कार दिला जात आहे. या वर्षी म्हणजे १३ ॲागस्टला प्रख्यात कवी, पद्मश्री ना. धो. महानोर यांना हा पुरस्कार जळगाव येथे दिला जात आहे. ‘जैन इरिगेशन’चे अध्यक्ष अशोकबाबू जैन यांच्या हस्ते महानोर यांना सन्मानित केले जाईल. आमादर शिरीष मधुकरराव चौधरी प्रमुख पाहुणे आहेत. महानोर खरा रानातला कवी. त्यांचा ‘वही’ हा कवितासंग्रह वाचून यशवंतराव चव्हाणांनी त्यांना विधानपरिषदेत आमदार केले. पण, महानोर आमदार झाल्याने मोठे नाहीत. हा कष्टकरी शेतकरी आहे. डोंगरातले झरे आडवून या शेतकऱ्याने टाक्या बांधल्या आणि आपल्या शेतीला मे महिन्याच्या अखेरपर्यंतचे पाणी मिळवले. आज पळसखेडला कष्टातून त्यांनी शेती फुलवली. इकडे शब्दांतून कविता फुलवली. 

 या नभाने या भूईला दान द्यावे....

 आणि मातींतून या गीत गावे....  

कोणती पुण्ये येती फळाला....

 जोंधळ्याला चांदणे लगडून जावे....  

असा हा आगळावेगळा कवी. शेतात राहणारा... कवितेत रमणारा... साधा पायजमा आणि शर्ट हा वेष कधी बदलला नाही. कवितेसाठी शब्दाला कधी आडला नाही. आणि निसर्गाला कधी विसरला नाही. या वर्षीचा अत्रेसाहेबांच्या नावाचा पुरस्कार ना. धो. महानोर यांना अर्पण होत आहे. कवी अत्रेसाहेबांना याचा स्वर्गात नक्कीच आनंद वाटेल. ‘गीतगंगा’ या कविता संग्रहात मनाला भिडणारी त्यांची एक कविता आहे....  

आतल्या आत... मन बसे सारखे गात....

 आचार्य अत्रे यांच्या आयुष्याची सुरुवात शिक्षक म्हणून झाली. पण, कवी म्हणूनही त्यांनी सुरुवात केली. त्यांचे काव्य शब्दाला भिडले नाही, मनाला भिडले. मनाला भिडले. त्यामुळे मनातून उतरलेल्या शब्दांनी काळीज हलवून सोडले. आजही त्यांच्या कविता आठवतात.... ज्या तिसरी- चौथीत पाठ करून ठेवल्या होत्या... 

‘आजीच्या जवळी... 

  घड्याळ कसले... 

आहे चमत्कारिक... देई ठेवूनी ते कुठे

अजूनही नाही कुणा ठाऊक...

त्याची टिकटिक चालते न कधीही

आहे मुके वाटते....

किल्ली देईन त्यास... आजी...

             परि ते सारखे चालते...’ 

अशा एक नव्हे अत्रेसाहेबांच्या ‘नवयुग’ वाचनमालेतून माझी सगळी पिढी घडली आहे. लहान मुलांना काय शिकवावे, काय वाचायला सांगावे, हे नवयुग वाचन मालेने माझ्या पिढीला शिकवले. म्हणूनच ‘दिनूचं बिल’ ही गोष्ट वर्गात गुरुजी शिकवत असताना डोळ्यांतून आसवं तेव्हाही ओघळली होती.... एक होता दिनू... त्याचे वडील डॉक्टर. वडीलांबरोबर दवाखान्यात गेला. रुग्णांना तपासल्यावर वडील बिल घेत आहेत हे त्याने पाहिले. त्याने विचारले, ‘कशाचे बिल घेता?’ वडील म्हणाले, ‘माझ्या कमाचे....’ दिनूच्या मनात विचार आला.... अरे, आपण आईची एवढी कामं करतो... आपण कुठे बिल करतो? तो घरी गेला... त्याने एक बिल केलं... आईच्या उशाशी ठेवलं... आज अंगणात पाणी शिंपडले : १ आणा.... आज दळण आणून दिले : २ आणे आज विहिरीचे पाणी भरून दिले त्याचे २ आणे.दिनू असे दहा आण्याचे बिल करतो. आईच्या उशाशी ठेवतो. झोपी जातो... आई बिल वाचते. मग, ती एक बिल करून ठेवते... तू जन्मल्यापासून अनेकवेळा आजारी होतास... रात्र-रात्र तुला मांडीवर घेत होते... औषध पाजत होते... त्याचे काही नाही.... तुला रोज शाळेत सोडायला जात होते त्याचे काही नाही... तुला रोज शाळेतून घरी आणत होते त्याचे काही नाही... तुझे कपडे रोज धुते, तुला रोज आंघोळ घालायची... तुला भरवायचे... त्याचे काही नाही... एकूण काहीही नाही.... दिनूच्या उशाशी आई बिल ठेवते. सकाळी दिनू उठतो.... बिल वाचतो... आईला घट्ट मिठी मारतो.... त्याच्या डोळ्यांतून आसवे वाहतात तिथेच धडा संपतो. जवळजवळ ७५ वर्षांपूर्वी पोतदार गुरुजींनी शिकवलेली हा धडा आज आठवताना डोळे भरून येतात. ही अत्रेसाहेबांच्या लेखणीची ताकद होती. त्यांच्या सोबत दहा वर्षे राहता येईल, सगळ्या आयुष्याचं सोनं होईल, असं ‘दिनूचं बिल’ गोष्ट ऐकताना कधीतरी वाटलं होतं का ? आज त्याच अत्रेसाहेबांचा स्मृतीदिन आणि त्यांचा जयंतीदिन भावभक्तीने मनापासून साजरा करताना कृतज्ञा वाटते. अत्रेसाहेब नेहमी सांगायचे.... आयुष्यात काय वाट्टेल ते व्हा.... पण, कधीही, कोणाशीही कृतघ्न होवू नका. अत्रेसाहेब महाराष्ट्राशी कृतघ्न झाले नाहीत. पण महाराष्ट्र.... आणि आज एक प्रश्न मनात येतो... यावर्षी अत्रेसाहेबांचा पुरस्कार द्यायला महानोर यांच्यासारखा एक मोठा कवी आहे. पुढच्या वर्षीचा पुरस्कार कोणाला द्यायचा हे आतापासून माणूस शोधायचा म्हटलं तरी त्या ताकतीचा माणूस समोर येत नाही. जी आज मोठी माणसं आहेत.... त्या सर्वांना ५० वर्षांत हे पुरस्कार देवून झाले आहेत. अत्रेसाहेब तर नाहीतच... पण, त्यांच्या नावाचा पुरस्कार द्यावा, एवढ्या उंचीची माणसं सुद्धा आता मिळणं कठीण झाले आहे. आणि सगळ्यात मोठं दु:ख तेच आहे. सहा फुटांची माणसं गेली.... मोठ्या मनाची माणसं गेली... मोठ्या कतृत्वाची माणसं गेली... मोठ्या नेतृत्त्वाची माणसं गेली... माणसं उंचीनं खुजी झाली.... कामानं लहान झाली... मनानं तर खूपच लहान झाली... समंजस, सुसंस्कृत महाराष्ट्र आज धटींगण होत चालला आहे. अत्रेसाहेब नाहीत, या दु:खापेक्षाही याचेच भय जास्त आहे. या उंचीच्या माणसांचे पुरस्कार द्यायला तेवढ्या उंचीची माणसं आहेत कुठे? यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा पुरस्कार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जाहिर करत असते. पण आता यशवंतरावांच्या उंचीच्या माणूस शोधतानाही दमछाक होत आहे. अत्रेसाहेबांचे सोडा.... आमच्या सचिन ईटकरने भाऊसाहेब थोरात आणि आण्णासाहेब शिंदे नावाचे पुरस्कार जाहीर केले. मी त्याला म्हटले, ‘चांगली कल्पना आहे... दोन्ही मोठी माणसं... पण, त्यांच्या नावाचा पुरस्कार द्यायला तेवढी मोठी माणसं कुठं आहेत रे....’ आज देशात गांधी आहेत... पण महात्मा नाहीत.... नेहरू आहेत पण जवाहर नाही.... आझाद आहेत... पण मौलाना नाहीत... नायडू आहेत... पण, सरोजीनी नाहीत.... पटेल आहेत... पण सरदार नाहीत.... चव्हाण भरपूर आहेत... पण यशवंतराव नाहीत... अत्रे आडनावाचेही आहेत... पण आचार्य नाहीत.... बिनकामचे भावे आहेत... पण, विनोबा नाहीत.... काय करायचे... ? यावर्षी महानोर हा उंचीचा माणूस मिळाला तरी...पुढच्या वर्षी कोण? आतापासूनच शोधाशोध करायला हवी... !

 - मधुकर भावे