कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यानंतर शंभूराज देसाई रविवार, दि. १४ रोजी प्रथमच मतदारसंघात येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयार केली आहे. मतदारसंघात कार्यकर्त्यांचा उत्साह जोरात दिसून येत आहे.
युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची मल्हारपेठ येथे जाहीर सभा झाली होती. त्यांच्यानंतर मंत्री देसाई यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे त्यांच्या शक्ती प्रदर्शनाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
पाटण विधानसभा मतदारसंघात मंत्री देसाई यांचे कराड तालुक्यातील वारुंजी फाटा येथून लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यापर्यंत ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने गाड्यांची रॅलीही होणार आहे. त्यानंतर दौलतनगरला जाहीर सभा होणार आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषद गणात नियोजनासाठी बैठकीचे कार्यकर्त्यांनी आयोजन केले आहे. विजयनगर सुपने ते मरळी कारखाना या दरम्यान प्रत्येक गावात मंत्री देसाई यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
शंभूराज देसाई यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने पाटण तालुक्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच देसाई येत असल्याने कार्यकर्त्यांत उत्साह आहे. तालुक्यात स्वागताचे बॅनर्स तयार झाले आहेत. कारखाना कार्यस्थळावर जाहीर सभेचे नियोजन करण्यात आले आहे.
त्यामुळे उद्याच्या सभेत शंभूराज देसाई काय बोलणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.