रंगभूमी ‘जगलेले’ अभिनेते...प्रदीप पटवर्धन


मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिध्द ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे काल निधन झाल्याची बातमी वाचली आणि क्षणात त्यांच्याबरोबर व्यतित केलेली आठवण ध्यानात आल्या. शाळेत असताना मी ‘ब्लॅक व्हाईट’ टीव्हीवर अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे चित्रपट, मालिका पाहिल्या होत्या.

मी मुंबईला चंदनवाडी-मरीन लाईन्स् येथे असताना कामानिमित्त गिरगावला येणे जाणे नेहमी व्हायचे. त्यावेळी जाताना झावबावाडी लागायची. झावबावाडी-ठाकूरव्दार येथे प्रदीप पटवर्धन राहतात अनेकांकडून समजले. सन 2014 च्या दशकात सोशल मिडीया आजच्याएवढा प्रभावी नव्हता. त्यावेळी अनेकजण व्यक्त होण्यासाठी फेसबुकवर पोस्ट टाकायचे. चंदनवाडीत ‘सी वार्ड’ च्या पुढील बाजूस कोपऱ्यावर चहावाला होता. त्याच्याकडे आम्ही सकाळी चहा घेण्यासाठी जायचो. त्यावेळी मला एक दोनदा प्रदीप पटवर्धन तिथून चालत जाताना दिसले होते. परंतू त्यांच्या जवळ जावून त्यांच्याशी बोलण्याची माझी हिम्मत झाली नव्हती. एकदा मला ते ट्रेनमध्ये दिसले होते.

10 मार्च, 2014 रोजी प्रदीप पटवर्धन ‘सी वार्ड’च्या कार्यालयात आले होते. त्यांच्या कामाला वेळ लागणार होता म्हणून ते ऑफीसच्या खाली झाडाजवळ खुर्ची टाकून बसले होते. मी त्या ठिकाणाहून तिकडे जात असताना मला ते दिसले. यावेळी मी त्यांच्या जवळ गेलो. माझी ओळख सांगून मी त्यांना आपले चित्रपट पाहत असतो, आवडतात याची माहिती दिली. त्यांना तेथून जवळच असलेल्या आमच्या शिवसमर्थ संस्थेच्या कार्यालयास भेट देण्यासाठी विनंती केली. त्यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ‘चला जावूया’ असे म्हणत माझ्यासोबत आले. ऑफीस मध्ये आल्यानंतर त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी त्यांचा संस्थेची दिनदर्शिका, दिवाळी अंक आणि शाल देवून सन्मान करण्यात आला. त्यानंतर ते आपल्या कामासाठी निघून गेले.

अनेक चित्रपट, मालिका, नाटके यामधून आपली लक्षवेधी भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याचे पाय अखेरपर्यंत जमिनीवर होते. त्यांच्या मध्ये असणारा कमालीचा नम्रपणा मला विशेष जाणवून गेला. हल्ली एक दोन मालिका, चित्रपट किंवा जाहिरात केलेल्या कलावंताच्या वागण्यातील आवेश पाहिला तर प्रदीप पटवर्धन यांच्या सारख्या अभिनेत्यांची लोकांशी समरस होण्याची भावना आठवल्या वाचून राहत नाही. आपल्या सार्वजनिक जीवनातील वागण्या बोलण्यातून समाजमनावर असे दिग्गज अभिनेते आपली छाप पाडतात. प्रदीप पटवर्धन हे असेच व्यक्तिमत्त्व होते. शेवटपर्यंत खऱ्या अर्थाने रंगभूमी जगलेल्या ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या आत्म्यास ईश्वर चिरशांती देवो ही प्रार्थना....!

-डॉ. संदीप डाकवे
-स्पंदन परिवार