उद्या शुक्रवार शिबेवाडीच्या डोंगरावरील माता काळंबा देवीचा वार्षिक भंडारा


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा 

पाटण तालुक्यातील  ढेबेवाडी खोऱ्यातील गुढे ग्रामपंचायत हद्दीतील वरची शिबेवाडी (डोंगरावरील) जागृत देवस्थान समजल्या जाणाऱ्या आणि नवसाला पावणाऱ्या माता काळंबादेवीचा वार्षिक भंडारा जत्रोत्सव शुक्रवार दि.19 ऑगस्ट, 2022 रोजी धुमधडाक्यात हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे.

वरची शिबेवाडी (डोंगरावरील) हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या श्री काळंबादेवी मातेचा वार्षिक भंडारा दरवर्शी गोपाळकाला दिवशी साजरा केला जातो. त्यानिमित्त या मंदिरात शुक्रवार दि.12 ऑगस्ट, 2022 पासून अखंड विना व हरिनाम सप्ताह सुरु आहे. दोन वर्षाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारा हा पहिलाच भंडारा आहे. या पारायण सोहळयात दररोज काकड आरती, हरीपाठ, कीर्तन, भजन आदी धार्मिक कार्यक्रम होत आहेत. शुक्रवार दि.19 ऑगस्ट, 2022 रोजी दिवसभरात देवीची पालखी मिरवणूक, दहीहंडी फोडणे आणि महाप्रसाद वाटप आदी कार्यक्रम पार पडणार आहेत.

दुपारी शिवरीच्या माळावर पाचूपतेवाडी येथील हनुमानाची पालखी आल्यानंतर दोन्ही पालख्यांची भेट होवून पालख्यांनी मंदिराची प्रदक्षिणा घातल्यानंतर दहीहंडी फोडली जाते. त्यानंतर महाप्रसाद वाटप होतो. या दिवशी मेघराजा हमखास हजेरी लावतो असे म्हणतात. त्यावेळी पावसातही भाविक मोठया आनंदाने महाप्रसाद घेण्यासाठी रांगा लावतात. या भंडारा उत्सवासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबईतील देवीचे भाविक हमखास हजेरी लावतात. अत्यंत शांततेत एकोप्याने हा भंडारा उत्सव होत असतो. या उत्सवाची लोक आवर्जून वाट पाहतात.