कुंभारगाव मध्ये विधवा प्रथा बंदीचा ठराव.

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:

विधवा महिला ही सुद्धा एक माणूसच आहे व तिला मानाने आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, तो हिरावून घेणे हा एक प्रकारे कायद्याचा भंग आहे. विधवा प्रथेमुळे संबंधित महिलेच्या अधिकारावर गदा येत आहे म्हणून विधवेला समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी विधवा प्रथा बंद करण्याचा क्रांतिकारक निर्णय कुंभारगाव ग्रामपंचायतीने घेतला आहे. ग्रामसभेत विधवा प्रथा बंदीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

आपल्या समाजात पती निधनानंतर अंत्यविधी वेळी त्या विधवेच्या बांगड्या फोडणे,तिच्या कपाळावरील कुंकू पुसणे,तिचे सौभाग्यांलंकार काढून घेणे पुढे कोणत्याही धार्मिक कार्यात तिला सहभागी होता येत नाही अशा प्रथा आहेत हा तिच्या सन्मानाचा अपमान आहे.कायद्याने प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे मात्र वरील प्रथा परंपरेने तिच्या हक्कावर गदा येते व कायद्याचे उल्लंघन होते. तसेच गावामध्ये जनजागृती करण्याचे आवाहन ग्रामपंचायतींच्या वतीने करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले  आहे व विविध स्तरातून या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.

कुंभारगाव येथील सांस्कृतिक भवन येथे ही ग्रामसभा झाली या वेळी सरपंच सौ सारिका पाटणकर, उपसरपंच राजेंद्र चव्हाण, माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, माजी अर्थ, शिक्षण सभापती संजय देसाई, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक अनिल जाधव, शंकरराव चव्हाण, राजेंद्र देसाई, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

__________________________________

विधवा प्रथा बंदीची प्रभावीपणे अंबलबजावनी करण्यात येईल : 

सरपंच सौ.सारिका पाटणकर.

गावातील महिलांमध्ये जनजागृती करून विधवा प्रथा बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. या अनिष्ट प्रथे मुळे महिलांना आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. विधवा महिलांना अनेक धार्मिक व आनंदाचाच्या कार्यक्रमात या प्रथे मुळे सहभागी होता येत नाही ही शोकांतिका आहे.अनेक वर्षापासून चालत आलेल्या या रुढी व प्रथा बंद करून महिलांना न्याय देण्याचा त्यांना सामाजिक समारंभात सन्मान करण्याचा व जन जागृती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न राहील.

-सरपंच सौ सारिका पाटणकर 

___________________________________