"आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव" पुरस्काराने मान्याचीवाडीचा गौरव ; मान्याचीवाडी ठरले जिल्हयातील स्मार्टग्राम.


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या "आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव" पुरस्कारासाठी पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची निवड झाल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने जाहीर केले. चाळीस लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून लवकरच या पुरस्काराने ग्रामपंचायतीला गौरविण्यात येणार आहे. जिल्हा स्मार्टग्रामची घोषणा होताच गावकऱ्यांनी जल्लोष करत एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. वीस वर्षांत तब्बल बासष्ट पुरस्कारांची कमाई करणारी मान्याचीवाडी ग्रामपंचायत ग्रामविकासात दिशादर्शक ठरली आहे. 

    पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ही सुमारे पाचशे लोकसंख्येची ग्रामपंचायत. शासनाची कोणतीही नाविन्यपूर्ण योजना अथवा उपक्रम येथे अगदीच प्रभावीपणे राबविले जातात. यामुळेच आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासनाच्या विविध पुरस्कारांवर मान्याचीवाडीने आपले नाव कोरले आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व.आर.आर.आबा पाटील स्वच्छ सुंदर गाव पुरस्कार योजना चालू करुन आदर्श(स्मार्ट ग्राम) गावे निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामध्ये तालुका आणि जिल्हा स्तरावर या स्पर्धा घेण्यात आल्या. 

    जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून निवड झालेल्या ग्रामपंचायतीस तालुका स्मार्ट पुरस्कार जाहीर केला. तर प्रत्येक तालुक्यातून निवड झालेल्या अकरा ग्रामपंचायतीमधून जिल्हा स्मार्टग्रामसाठी तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने सर्वांधीक गुण मिळवत (जिल्हा स्मार्टग्राम) आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार पटकावला. 

    शासनाच्या निकषानुसार मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने अपेक्षित बाबींची पूर्तता केल्याने सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी हा पुरस्कार जाहीर केला. आतापर्यंत या ग्रामपंचायतीने केंद्र शासनाचे गौरव ग्राम पुरस्कार, पंचायत सशक्तीकरण पुरस्कार, निर्मलग्राम पुरस्कार तर राज्य शासनाचे तंटामुक्त पुरस्कार, माझी वसुंधरा पुरस्कार, पर्यावरण विकास रत्न पुरस्कार, संत गाडगेबाबा स्वच्छ सुंदर गाव पुरस्कार, यशवंत पंचायत राज पुरस्कार, सानेगुरुजी स्वच्छ शाळा पुरस्कार, जिजाऊ कुपोषण मुक्त अंगणवाडी पुरस्कार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, स्व.आबासाहेब खेडेकर पुरस्कार, स्व.वसंतराव नाईक पुरस्कार आदी पुरस्कारांंनी सन्मानित करण्यात आले आहे. 

    नुकताच आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार जाहीर झाल्याने गावकऱ्यांनी एकत्रीत येऊन एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. यावेळी सरपंच रवींद्र माने, उपसरपंच अधिकराव माने, सदस्य रामचंद्र पाचुपते, लता आसळकर, संगिता माने, सुजाता माने, ग्रामसेवक प्रसाद यादव, तंटामुक्त अध्यक्ष दादासो माने, चेअरमन सर्जेराव माने, व्हा.चेअरमन प्रकाश गुंजाळकर, शामराव आसळकर, दिलीप गुंजाळकर, उत्तमराव माने आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, माजी शिक्षण सभापती प्रा.उत्तमराव माने, गटविकास अधिकारी गोरख शेलार, मीना साळुंखे आदिंनी अभिनंदन केले.

____________________________________

गावकऱ्यांच्या एकजुटीचा सन्मान...

ग्रामपंचायतीच्या निर्मीतीला वीस वर्षे झाली. आतापर्यंत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. त्यासाठी स्व.तात्यासाहेब माने यांचे आदर्श, प्रा.उत्तमराव माने यांचे मार्गदर्शन, प्रशासनाचे सहकार्य आणि गावकऱ्यांची एकजूट हेच या यशाचे रहस्य आहे. आता मान्याचीवाडीकडे ग्रामविकासाचे अभ्यासकेंद्र म्हणून पाहीले जात आहे हेच समाधान आहे. 

रवींद्र माने,
सरपंच मान्याचीवाडी.

____________________________________