आदित्य ठाकरेंच्या पाटण येथील शिवसंवाद यात्रेला अलोट गर्दी
पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा:  
महाराष्ट्रात शिवसेना फोडण्याचं राजकारण सुरु आहे, ठाकरे परिवाराला एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. नागरिकांची एकजूट, हिंदुत्वाची एकजूट, शिसैनिकांची एकजूट, तोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण हे कोणाला शक्य होणार नाही. बंधू भगिनींनो गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसू नका, असं आवाहन करताना आपलं प्रेम आणि आशीर्वाद ठाकरे कुटुंबावर असू द्यात, अशी साद आदित्य ठाकरे यांनी जमलेल्या हजारो उपस्थितांना घातली.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा सुरु आहे. आज त्यांची यात्रा शिंदे गटात गेलेल्या बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यात दाखल झाली. यावेळी हजारो शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. त्यांच्या स्वागताला जमलेली गर्दी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होती. उपस्थितांचा उत्साह पाहून आदित्य ठाकरे यांनीही दणकेबाज भाषण केलं.

आपल्याच लोकांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आता त्यांना आपलं म्हणावं की नाही, असा प्रश्न पडतो. कारण त्यांनी ठाकरे कुटुंबाचे फोटो आता आपल्या कार्यालयातून काढन सुरु केलंय. असो... ज्यांनी आपल्याशी गद्दारी केलीय, त्यांना धडा शिकवायचाय, त्याच इराद्याने मी तुमच्यापर्यंत आलो आहे. 

महाराष्ट्रात शिवसेना फोडण्याचं राजकारण सुरु आहे, ठाकरे परिवाराला एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण ते कदापि शक्य होणार नाही. ठाकरेंशिवाय शिवसेना असू शकत नाही, असा पुनरुच्चार आदित्य ठाकरेंनी केला.

गद्दारी करून बनवलेलं हे सरकार घटनाबाह्य आणि गद्दारांचं सरकार आहे आणि ते फार काळ टिकणार नाही. हिम्मत असेल तर राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा, असं आव्हान देखील आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केलं.