स्पंदन’ ने सामाजिक जाणिवा जपण्याचं काम केलं - श्रीनिवास पाटील

 


तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

‘स्पंदन’ ने सामाजिक जाणिवा जपण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं. ट्रस्टने आतापर्यंत राबवलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत असे गौरवोद्गार सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि खासदार श्रीनिवास पाटील यांनी काढले ते पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित केलेल्या ‘‘राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड’’ सोहळयात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सुप्रसिध्द शिवव्याख्याते प्रा.अरुण घोडके, प्रेरणा सवंर्धन तज्ञ तथा परिवर्तन संस्था सातारचे किशोर काळोखे, शिवचरित्र आणि संभाजी महाराज चरित्र अभ्यासक ह.भ.प. प्रा.डाॅ.प्रदीप पांडूरंग यादव, प्रा.ए.बी.कणसे, महात्मा गांधी विद्यालय, पाचवडचे कलाशिक्षक बाळासाहेब कचरे, कलाशिक्षक जयंत कदम, अभिनेते रवि साळुखे, अभिनेत्री सुनंदा शेंडे, अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शकुंतला खटावकर, ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे व इतर मान्यवर उपस्थित होते.



खा.श्रीनिवास पाटील यांनी आपल्या रांगड्या मराठमोळ्या भाषेत उपस्थितांशी दिलखुलास संवाद साधला. ‘‘प्राईड’’ ‘‘स्पंदन’’, ‘‘संदीप’’ ‘‘डाकवे’’ या शब्दांचा अर्थ अगदी मोजक्या शब्दात सांगितला. ते पुढे म्हणाले, ‘‘या पुरस्काराने तुमची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. डॉ.संदीप डाकवे, स्पंदन परिवार यांनी आयोजित केलेला सोहळा पाहून मला खूप आनंद वाटला. डॉ.संदीप यांची आई वडील पाहिल्यानंतर मला माझे आई वडील आठवले.’’ बोलताना ते खूप भावूक झाले. त्यांनी सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्तींना, संस्थाना शुभेच्छा तर दिल्या. त्याचबरोबर आपल्या हातून उतरोत्तर चांगले कार्य घडत रहावो अशा भरभरुन सदिच्छा दिल्या.

शिवव्याख्याते प्रा.अरुण घोडके म्हणाले, ‘‘प्रत्येक घराघरांमध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन होते. ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवला जातो. त्याप्रमाणे शिवचरित्र ग्रंथाचेही वाचन केले पाहिजे. स्पंदन ट्रस्टने आयोजित केलेला सोहळा अतिशय सुंदर आहे. स्पंदन ट्रस्टने जपलेली सामाजिक बांधिलकी अभिमानास्पद आहे.

संभाजीराजे यांचे विचार घराघरात पोहचले पाहिजेत. संभाजीराजे कोण होते हे समजून घ्यायचे असेल तर संभाजी महाराज यांचे चरित्र वाचले पाहिजे तरच संभाजी महाराज सिंहासारखा वाघ होता हे समजेल. अशा शब्दात शिवचरित्र आणि संभाजी महाराज चरित्र अभ्यासक ह.भ.प.प्रा.डाॅ.प्रदीप पांडूरंग यादव यांनी आपले मनोगत व्यक्त करत डाॅ.संदीप डाकवे आणि स्पंदन परिवारांच्या उपक्रमांचे कौतुक केले.

परिवर्तनचे किशोर काळोखे म्हणाले, ‘‘स्पंदन म्हणजे काय तर हृदयाची एक टीक-टीक, त्यांनी काव्यात्मक शैलीत कार्यक्रमाचे महत्व समजावून सांगितले. हा पुरस्कार म्हणजे मनाला चेतना देणारा पुरस्कार सोहळा आहे. स्पंदनचे उपक्रम नेहमीच मनाला प्रेरणा देतात.

दरम्यान, यंदाचा ‘‘स्पंदन जीवन गौरव पुरस्कार’’ खा.श्रीनिवास पाटील यांना प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांसह डाॅ.संदीप डाकवे, सौ.रेश्मा डाकवे, सौ.गयाबाई डाकवे, राजाराम डाकवे, चि.स्पंदन डाकवे व स्पंदन परिवारातील सदस्य उपस्थित होते. तसेच स्पंदन ट्रस्टच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेणारे ‘प्रतिबिंब’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.

दीपप्रज्वलनानंतर कार्यक्रमाची सुरुवात कलाशिक्षक सुरेश जाधव, सुनील राजे आणि विद्यार्थी यांनी गायलेल्या गीतांनी झाली. या कार्यक्रमात राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार 90, सॅल्युट कार्ड स्पर्धेतील 9, सेल्फी विथ गुढी स्पर्धेतील 12 आणि 10 दिवाळी अंक स्पर्धकांना सन्मानचिन्ह, पुस्तक, सन्मानपत्र देवून गौरवण्यात आले.

बाळासाहेब कचरे, जयंत कदम, अभिनेते रवि साळुखे, अभिनेत्री सुनंदा शेंडे, उत्तम बावडेकर यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक डाॅ.संदीप डाकवे यांनी केले तर आभारप्रदर्शन पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांनी मानले. बहारदार सुत्रसंचालन प्रा.सुरेश यादव व प्रा.डाॅ.कोमल कुंदप यांनी केले. कार्यक्रमास सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्ती आपले कुटूंबिय, नातेवाईक व सहपरिवारासह उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कांबळे, संतोष करपे, विकास साळुंखे, ईलाही मुल्ला, ज्ञानेश्वर शेवाळे, सुरेश जाधव, जीवन काटेकर, अंजली गोडसे, रेश्मा डाकवे, भारती पोळ, पूनम जाधव व अन्य सहकारी यांनी विशेष प्रयत्न केले.

कार्यक्रमातील विशेष क्षणचित्रे :

स्पंदन अवॉर्ड चे पुरस्कार, मान्यवर आणि विविध स्पर्धांचे पुरस्कार वितरण यासाठी वेगवेगळया रंगाचे फोटो हे या कार्यक्रमांचे विशेष आकर्षण ठरले. हे फेटे नांदलापूर येथील निखील जेन्टस् पार्लर चे मालक शहाजी वास्के आणि त्यांचे सहकारी रुपेश चव्हाण यांनी बांधले होते.

कलाशिक्षक डी. एस. दीक्षित यांनी रेखाटलेले शिवाजी महाराज यांचे चित्र खासदार श्रीनिवास पाटील यांना दिले.

 लग्नाची बेडी मालिका फेम रवि साळुंखे, मुलगी झाली हो फेम अभिनेत्री सुनंदा शेंडे यांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती.

छगन शाबू शिंदे मु.पो.एनकुळ ता.खटाव, जि.सातारा हे आरोग्य खात्यातून सेवानिवृत्त झालेली व्यक्ती फक्त वर्तमानपत्रातील बातमी वाचून या कार्यक्रमास हजर राहीले होते. त्यांनी हार गुच्छ देवून डाॅ.संदीप डाकवे, राजाराम डाकवे आणि गयाबाई डाकवे यांचा सन्मान केला.

83 वर्षाचे कॅप्टन मोरे सर्वांच्या आधी कार्यक्रमास हजर राहीले होते त्यांनी देशभक्तीपर गीते गात व सातारा जिल्हयातील सैनिकांची महती सांगून कार्यक्रमात आपली वेगळी छाप पाडली.

समर्पक सुंदर भाषेत ‘‘प्राईड स्पंदन संदीप या शब्दांचा अर्थ खा.श्रीनिवास पाटील यांनी आपल्या भाषणात घेतला. डाॅ.संदीप डाकवे आणि त्यांच्या परिवाराचे कोडकौतुक केले.

प्राईड ऑफ स्पंदन, सेल्फी विथ गुढी, सॅल्युट कार्ड स्पर्धा, दिवाळी अंक स्पर्धा यांची सन्मानचिन्हे आणि सन्मानपत्रे आकर्षक आणि लक्षवेधी होती.

प्रमुख पाहुण्यांच्या सत्कारासाठी वेगळी शाल आणि बुकेऐवजी पुस्तक देण्यात आली हे एक आणखी वेगळेपण ठरले.

स्पंदन ट्रस्ट ने आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती सांगणारे ‘‘प्रतिबिंब’’ हे पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.



पुरस्कारर्थी व्यक्तिंच्या शर्टवरील प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड चा बॅच, डेस्कवरील अक्षरे आणि स्टेजचा बॅनर सर्वांचे लक्ष मोहून टाकत होते. हे सर्व डिझाइन कलाशिक्षक बाळासाहेब कचरे यांनी केले होते

राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड, सॅल्युट कार्ड स्पर्धा, सेल्फी विथ गुढी स्पर्धा, दिवाळी अंक स्पर्धा इ.ची सन्मानचिन्हे, सन्मानपत्रे आकर्षक होती. ही सन्मानचिन्हे सिटी आर्टस् चे मालक चंद्रकांत तुपे यांनी केली होती.

कलाशिक्षक सुरेश जाधव, सुनील राजे आणि विद्यार्थी यांनी गायलेल्या गीतांनी कार्यक्रमात जान आली.

खा.श्रीनिवास पाटील, अभिनेता रवि साळुंखे, अभिनेत्री सुनंदा शेंडे व इतर मान्यवर यांच्यासोबत फोटो, सेल्फी काढण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती.

 जितेंद्र पवार यांच्या गावठी मॅटर वेबसिरीज टीमने आपली उपस्थितीने दखल घ्यायला लावली.

संपर्ण कार्यक्रम अतिशय सुंदर वेळेत, नियोजनबध्द झाला. विशेष म्हणजे कार्यक्रम संपेपर्यंत कोणीही सभागृह सोडले नाही.

कार्यक्रमासाठी सातारा,  पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर, कराड, पाटण व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते.