प्राना फाऊंडेशच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम

माजी आमदार नरेंद्र पाटील यांचे ढेबेवाडी येथे प्रतिपादनढेबेवाडी|कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
विद्यार्थ्यांनी मोबाईलचा दुरुपयोग टाळून त्याचा वापर अभ्यासासाठी करावा प्राना फाउंडेशन च्या माध्यमातून या विभागात समाजकार्य करत असताना त्यामध्ये समाजाचाही सहभाग असणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ढेबेवाडी येथे प्राना फाउंडेशनच्या माध्यमातून अभ्यास सेंटर सुरू करावे, डॉ. प्राची पाटील प्राना फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहेत असे प्रतिपादन मा. आमदार नरेंद्र पाटील यांनी केले. 

प्राना फाऊंडेशन आयोजित इयत्ता दहावी-बारावी मधील गुणवंत विद्यार्थी पारितोषक समारंभामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

यावेळी प्रा. बाजीराव पाटील, सर्जेराव यादव, अंकुशराव मोरे, तेजस गमरे,प्राचार्य जे. डी. साठे, माधवीताई मोरे, प्रा. सचिन पुजारी, कविता कचरे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना प्रा. बाजीराव पाटील म्हणाले आपल्याला कष्ट करून शिक्षण देणारे आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर आणा व मनामध्ये दृढ इच्छाशक्ती निर्माण करून यश संपादित करा. ग्रामीण भागातल्या विद्याथ्यांमध्ये गुणवत्ता भरपूर आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला शंभर टक्के योगदान द्यावे लागेल त्यावेळी तुम्ही चांगली व्यक्ती बनू शकता व यश मिळवू शकता विद्याथ्यांसाठी प्राना फाउंडेशन चे कार्य कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.

 यावेळी प्राचार्य जे. डी. साठे, तेजस गमरे, सर्जेराव यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. प्राची पाटील म्हणाल्या, प्राना फाउंडेशनच्या माध्यमातून या विभागांमध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, शेती व प्रामुख्याने महिला सबलीकरण अशा अनेक क्षेत्रांमध्ये काम सुरू असून समाज घडवायचा असेल तर प्रत्येकाची मदत गरजेची आहे.

कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार पोपटराव देशमुख यांनी मानले.