आईचा सर्वोत्तम पुत्र म्हणजे 'छ.शिवाजी महाराज': प्रा.विनोद बाबर.

सुशीला पाटील सामाजिक संस्थेचा वर्धापन उत्साहात.

स्वर्गीय सौ सुशीला ज्ञानदेव पाटील बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिन प्रसंगी दीप प्रज्वलन करताना प्रा.डॉ.विनोद बाबर, बाबुराव पवार,प्रदीप पाटील, विजयसिंह पाटील व संस्थेचे पदाधिकारी

कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

तुमच्या कतृर्त्वाने आईच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील आणि बापाची छाती अभिमानाने फुलेल हेच सर्वात मोठे यश आहे. आजकाल आपले आदर्श चुकीचे बनले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हेच आपले खरे आदर्श आहेत. एका आईचा सर्वोत्तम पूत्र होणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे जीवन जगणे होय, असे मत प्रेरणादायी व्याख्याते प्रा. डॉ. विनोद बाबर यांनी व्यक्त केले. 

तांबवे, ता. कराड येथे स्व. सै. सुशीला ज्ञानदेव पाटील सामाजिक बहुद्देशीय संस्थेचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृष्णकमल ज्वेलर्सचे प्रमुख, उद्योजक बाबूराव पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रदीप पाटील, उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील, संस्थेच्या अध्यक्षा सौ.नयना पाटील- खबाले, सविता पाटील, सौ स्वाती शिंदे, महेश पाटील ,अक्काताई वीर, श्रीमान पाटील आदी उपस्थित होते. या प्रसंगी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य सैनिक स्व. लक्ष्मण पावसकर यांच्या पत्नी रजनी पावसकर यांचा सत्कार करण्यात आला. 

प्रा. बाबर म्हणाले, मोबाईलच्या अतिवेडेपणामुळे युवा वर्गाचे जगणे, मरणे मोबाईल ठरवू लागला आहे. आमचे आदर्श चुकीचे ठरत आहेत. सोशल मीडियावर जे दिसते ते आमचे आदर्श असता कामा नयेत. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे हे इतिहास निर्माण करणारी ही माणसे आहेत. त्यांचा आदर्श हवा. यांचा इतिहास मुलांमध्ये रुजवला तरच ते घडतील. जिजाऊंच्या आयुष्याचे सार्थक आणि छत्रपती शहाजीराजेंच्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. छत्रपती शिवाजी महाराज होणे म्हणजे त्यांच्यासारखे किल्ले जिंकण्याची गरज नाही तर आईचा सर्वोत्तम पुत्र बनणे म्हणजे छ. शिवाजी महाराज होणे होय. वतनदाराचा मुलगा ते स्वराज असा इतिहास अवघ्या ३५ वर्षात उभा केला. तोच आदर्श समोर ठेवून आम्हाला जगले पाहिजे. 

बाबुराव पवार म्हणाले, स्व. सुशीला पाटील यांना तहयात जीवंत ठेवण्याचे काम पाटील कुटुंबीय व ट्रस्टी संस्थेच्या माध्यमातून करत आहेत. तांबवे गावाला क्रांतीचा इतिहास असून, त्या इतिहासाचा वारसा संवर्धनाचे काम ही संस्था करत आहे. आईची शक्ती, माया अदृश्य असते. तीचे स्मरण करताच ती आपल्या पाठिशी उभी राहते. आईच्या संस्काराचे बीज असलेली ही संस्था लवकरच व्यापक होईल. 

प्रदीप पाटील म्हणाले, तांबवे गाव स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी आहे. तांबवे गावात ज्ञानदेव पाटील, सुशीला पाटील या दांपत्याने केलेले काम मोलाचे आहे. आई-वडीलांचे संस्कार, दातृत्व जपण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून होत आहे. संस्थेने वर्षभरात राबवलेले उपक्रम गावासाठी अभिमानास्पद आहेत. 

नयना खबाले यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कामाची माहिती दिली. सुधीर नलवडे, अनिल काटवटे यांनी मनोगत व्यक्त केले. चिमुकली अधिरा चव्हाण हिने स्वातंत्र्य दिनावर भाषण केले. सौ अंकिता कदम यांनी सूत्रसंचालन केले. विकास खडंग यांनी आभार मानले. 

---------------------------------------------------------

सुशीला पाटील जीवंतच.

स्व. सुशीला पाटील यांनी दातृत्व, कर्तृत्वाने समाजामध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली. त्या परीस होत्या. त्यांच्यामुळे अनेकांची जीवने बदलली. मृत्यूपश्चातही समाज आज त्यांचे आत्मियतेने स्मरण करत आहे. व्यक्तीचे नाव समाज घेत राहतो, तोपर्यंत ती व्यक्ती जीवंतच असते. सुशीला पाटील यासुध्दा जीवंत असून, संस्थेच्या माध्यमातून त्या समाजावर अविरत प्रेम करत राहतील, असे प्रतिपादन प्रा. विनोद बाबर यांनी केले.

--------------------------------------------------------