सध्याचा काळ हा शैक्षणिक संक्रमणाचा असून शिक्षकांसह विद्यार्थ्यांना ज्ञानसमृद्ध करण्यासाठी व त्यांचा बौद्धिक विकास साधण्यासाठी हिंदी अध्यापक मंडळ विविध उपक्रम राबवित आहे त्याचा इतरांनी आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन सातारा कला- वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ लेखक व विख्यात वक्ते डॉ यशवंत पाटणे यांनी केले.
सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ व राष्ट्रभाषानुरागी शिक्षक -शिक्षकेतर सेवक पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदी मंडळाच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देणार्या तसेच पदोन्नतीप्राप्त शिक्षकांच्या व पतसंस्थेच्या गुणवंत सभासदांच्या सत्कार कार्यक्रमात अध्यक्षपदावरून डॉ. पाटणे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आयुक्त प्रभाकर देशमुख होते. तर यावेळी पतसंस्थेचे संस्थापक, हिंदी अध्यापक मंडळाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ता.का. सूर्यवंशी, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे कोल्हापूर विभागीय उपाध्यक्ष आर. वाय. जाधव, जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज मुजावर, इकबाल मुल्ला, कार्यवाह अनंत यादव, सेक्रेटरी विजय यादव, माजी सेक्रेटरी मारुती शिवदास, माजी चेअरमन सुधाकर माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सहकार्यवाह नारायण शिंदे, प्रधानाचार्य महाळाप्पा शिंदे, अनिल यादव व पतसंस्थेच्या १९ सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात अला.