.....त्यांचा कुंचला भरतोय सामाजिक बांधिलकीचे रंग


तळमावले/वार्ताहर :
सतत नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून समाजाप्रती असणारे आपले दायित्व निभावण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात. कलेच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त रुपयाची रोख मदत केली आहे. याच भावनेतून ते आपल्या गावच्या मंदिराच्या जीर्णोध्दासाठी आपला खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करताहेत. त्या संवेदनशील मनाच्या अक्षरगणेश कलावंताचे नाव आहे डाॅ.संदीप डाकवे.

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील श्री दत्त मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम सुरु आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, ग्रामस्थ व देणगीदार मंदिरासाठी सढळ हस्ते मदत करत आहेत. या धार्मिक व विधायक कार्यात आपलाही काहीतरी वाटा असावा यासाठी संदीप डाकवे यानी ‘‘एक अक्षरगणेश कलाकृती मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी’’ हा अभिनव उपक्रम राबवला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी डाॅ.संदीप डाकवे यांच्याकडून आपल्या आवडीच्या नावाचा अक्षरगणेशा रेखाटून घ्यायचा त्या बदल्यात त्यांना रु.1,000/- ची मदत करावयाची आहे. ही मदत मंदिरासाठी देण्यात येणार आहे. यामुळे आपणास अक्षरगणेशा मिळेलच परंतू मंदिर जीर्णोध्दाराच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचा आनंदही मिळेल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम आयोजित केला आहे. 31 ऑगस्टला लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. शुक्रवार दि.9 सप्टेंबर, 2022 अखेर हा उपक्रम चालणार आहे. डाॅ.डाकवे यांनी अक्षरगणेशातून मदत केलेल्या उपक्रमाचे हे 6 वे वर्ष आहे. प्रत्येक वर्षी वेगळा उपक्रम राबवून ते गरजूंना मदत करत आहेत. हा उपक्रम स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राबवण्यात आला आहे. एकंदरीत डाॅ. डाकवे यांच्या कुंचला सामाजिक बांधिलकीचे रंग भरत आहेत.

डाॅ.संदीप डाकवे यांनी कलेमध्ये विविध उपक्रम राबवत 5 विश्वविक्रम केले आहेत. शासनाने त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत 4 वेळा तर विविध सामाजिक संस्थांनी 50 हून अधिक पुरस्कार देवून गौरवले आहे. तसेच स्पंदन ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवले आहेत. त्याचे कौतुक विविध मान्यवर, सेलिब्रिटी यांनी केले आहे. तर प्रिंट मिडीया व इलेक्ट्राॅनिक मिडीया यांच्याकडून या कामाची सातत्याने दखल घेतली जाते.

____________________________________

2 वर्षाच्या कोरोनाच्या संकटानंतर यंदाचा गणेशोत्सव येत आहे. त्यामुळे सर्वजण जल्लोषात करतील. सार्वजनिक मंडळानी अक्षरगणेशा उपक्रम राबवून विधायक उपक्रम राबवण्यात यावा यामुळे मंदिरासाठी भरघोस मदत करता येईल. आतापर्यंतच्या सर्व उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याही उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन अक्षरगणेश कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी केले आहे.

____________________________________