ढेबेवाडीतील ब्रिटिशकालीन कार्यालय हलविण्याचा घाट ;

अधिकाऱ्यांची सोय : ग्रामस्थ संतप्त



 हेच ते ढेबेवाडी येथील वन्यजीव चे ब्रिटीशकालीन कार्यालय

पाटण |कृष्णाकाठ वृत्तसेवा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे ढेबेवाडीतील वन्यजीव विभागाचे ब्रिटिशकालीन कार्यालय सांगली जिल्ह्यात मणदुरे येथे स्थलांतरित करण्याचा घाट घातला जात आहे. तसे झाल्यास वन्यश्वापदांच्या हल्ल्यात बळी पडणाऱ्या मनुष्य व प्राण्यांची भरपाई मिळणे दुरापास्त होईल. अगोदरच वनविभागाचे अडमुठे धोरण, कालबाह्य, क्लिष्ट कायदे यामुळे खूप हेलपाटे घातल्यानंतर चुकून एखाद्या व्यक्तीला भरपाई मिळते. कार्यालय स्थलांतरित झाल्यास स्थानिक ग्रामस्थांना सांगली जिल्ह्यात हेलपाटे मारावे लागतील. त्यामुळे भीक नको पण कुत्रा आवर, असे म्हणण्याची वेळ येथील ग्रामीण जनतेवर येईल, अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून कार्यालय अन्यत्र हलवू नये, अशी विभागातील जनतेसह निसर्गप्रेमींची मागणी आहे.

या कार्यालयाचे स्थलांतर करू नये यासाठी तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रयत्न केले होते. त्यास यशही आले होते. नव्या सरकारच्या काळात पुन्हा एकदा त्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या सूचना व पत्राकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शंभूराज देसाई यांनी कार्यालय हलवू नये, यासाठीचे केलेले प्रयत्न काही अधिकारी जाणीवपूर्वक हाणून पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. हे कार्यालय हलविण्याचा पुनर्रचना प्रस्ताव पाठवला गेला आहे. नवीन रुजू झालेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक नानासाहेब लडकत यांनीही त्याला दुजोरा देत त्या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्याचे समजते आहे. तसे झाल्यास येथील ग्रामीण भागातील शेतकरी, ग्रामस्थांना आपली कामे, नुकसान भरपाई मिळविण्यासाठी सांगली जिल्ह्यात हेलपाटे मारावे लागून वेळ व पैसा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कार्यालय स्थलांतरित करू नये, अशी मागणी केली जात आहे.

ग्रामस्थांचा विरोध : अधिकाऱ्यांची सोय

कार्यालय स्थलांतरित करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. पश्चिम विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेंट बेन व राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनाही ढेबेवाडीचे कार्यालय आहे तेथेच ठेवण्याची विनंती केली आहे. तरीही त्या सूचनांकडे दुर्लक्ष करून कार्यालय हलवण्याचा घाट घातला जात आहे. ढेबेवाडी वनपरिक्षेत्र कार्यालय ब्रिटिशकालीन आहे. तेथे ज्येष्ठ साहित्यिक तथा निवृत्त वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी सेवा बजावली आहे. हे कार्यालय सर्वांना सोयीचे असून ग्रामस्थांना येथे येणे शक्य आहे. मात्र काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ब्रिटीशकालीन कार्यालय हलविण्याचा घाट घातला जात आहे.