कार्वे (ता.कराड) येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान व श्रीनिवास पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नारीशक्ती महिला प्रभाग संघाच्या वतीने आयोजित केलेल्या वार्षिक अधिवेशनास संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी उमेदचे जिल्हा अभियान समन्वयक अंकुश मोटे, जिल्हा समन्वयक स्वाती मोरे, श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या उपाध्यक्षा रचना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सारंग पाटील म्हणाले, तळागाळातील कुटुंबाना स्वयंरोजगार मिळावा व दारिद्रय कमी होऊन कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे म्हणून सरकार विविध योजना राबवते. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराची दिशा मिळत आहे. त्यातून ग्रामीण भागातील अनेक महिलांनी सक्षमीकरणाकडे यशस्वी झेप घेतली आहे. आपल्या जिल्ह्यातील महिला आवडीने उद्योग क्षेत्रात उतरत आहेत. त्यास शासन उमेदच्या माध्यमातून प्रभागसंघाला सहकार्य करत आहे. श्रीनिवास पाटील फाउंडेशन नेहमीच महिला भगिनींना व्यवसाय व विविध कला कौशल्य क्षेत्रात सक्षम करण्यासाठी प्रेरणा व मार्गदर्शन करत असते. फाउंडेशनच्या माध्यमातून उद्योग लक्ष्मी, कृषी लक्ष्मी, बचत गट मेळावे, आदीशक्ती विरमाता सन्मान असे अनेक उपक्रम जिल्हाभर राबवून महिलांचा सन्मान करण्यात आला आहे. तसेच प्रभाग संघ, महिला बचत गटातील महिलांच्या व्यवसायाला सक्षम करण्यासाठी त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळावी याकरिता प्रशिक्षण शिबीरे घेण्यात आली आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या उमेद अभियानाच्या माध्यमातून कार्वे नाका, कापील, कोडोली, गोळेश्वर, टेंभू, दुशेरे, झुंजारवाडी अशा विविध ठिकाणाहून आलेल्या महिला प्रभाग संघाकडून याठिकाणी व्यवसायाचे स्टॉल लावण्यात आले होते. घरगुती पद्धतीने बनवलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. दरम्यान श्रीनिवास पाटील फाउंडेशन तर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रभाग संघांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी तालुका व्यवस्थापक निलेश पवार, प्रभाग व्यवस्थापक श्री.चिन्मय वराडकर, गोळेश्वरचे सरपंच चंद्रकांत काशीद, माजी सरपंच प्रदीप जाधव, अवणी फाउंडेशनच्या समन्वयक राधिका लोखंडे, नारी शक्ती प्रभाग संघाच्या अध्यक्षा सुवर्णा देशमुख, नारी शक्ती महिला प्रभाग संघाच्या सदस्या, कार्वे परिसरातील विविध ठिकाणाहून आलेल्या प्रभाग संघाच्या महिलांची उपस्थिती होती.