शिवसेनेचे चिन्ह, नाव गोठवून हिंदुत्ववादी मतं एका पेटीत आणण्याचा डाव; चिन्ह गोठवल्यास आश्चर्य वाटायला नको; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा :

मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षात अंतर्गत कलह सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षाला खिंडार पडलं आहे. शिवसेनेचे बहुसंख्य आमदार शिंदे गटात सामील झाल्याने मूळ शिवसेना कुणाची? 

शिवसेनेचे चिन्ह असलेले धनुष्यबाण हे उद्धव ठाकरे यांच्या गटाचे की बंडखोर शिंदे गटाचे आहे याबाबत कायदेतज्ज्ञांसह आता राजकीय नेत्यांकडूनही त्याबद्दल चर्चा केली जात आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणाबाबत बोलताना सांगितले की, शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवून हिंदुत्ववादी मतं एकाच पेटीत आणण्याचा डाव असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली आहे.

सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुकांची शक्यता नाकारता येणार नाही. कारण सरकार स्थापन करण्यामध्ये प्रचंड वाद निर्माण होईल किंवा वाद उद्भवेल, अशी भीती मला वाटते. त्यामुळे नाइलाजानं त्यांना मुदतपूर्व निवडणुकीचं पाऊल उचलावं लागेल.

काँग्रेसचे काही आमदारही फुटण्याची शक्यता आहे, या चर्चेबद्दल विचारलं असता चव्हाण म्हणाले, “मला एवढंच माहीत आहे की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राहिलेली शिवसेना यांच्यातील आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी साम-दाम-दंड-भेदचा वापर केला जात आहे. त्यामुळे सावध राहिलं पाहिजे असं मी माझ्या पक्षश्रेष्ठींना सांगितलं आहे.”