"मुंबईच्या भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब." माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच खोचक ट्विट


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
राज्यात अडीच वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचे सरकारमध्ये पुनरागमन झाले आहे. भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षानं मुंबईत जोरदार सेलिब्रेशन केले. भाजपाच्या या जल्लोष कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस अनुपस्थित होते.

भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद घेण्याचे आदेश दिल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मुख्यमंत्रिपदी असलेले फडणवीस यांना थेट उपमुख्यमंत्रिपद सोपवण्यात आलं. सुरुवातीच्या पत्रकार परिषदेत स्वत: फडणवीसांना ते कोणतंही मंत्रिपद घेणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र सायंकाळपर्यंत चित्र पालटलं.

फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपद देणं या बातमीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यामुळे देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. प्रदेश भाजपाच्या जल्लोष कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यानंतर सवाल उपस्थित केले जात आहे. 

Tweet पाहण्यासाठी क्लिक करा : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खोचक ट्विट.



दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खोचक ट्विट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, "मुंबईच्या भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब." त्यांच्या या ट्विटची मोठी चर्चा सुरू आहे.

देवेंद्र फडणवीसांसह भाजपाचे दिग्गज नेते या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर हे भाजपाचे दिग्गज नेते या कार्यक्रमाला अनुपस्थित होते.

 सुधीर मुनगंटीवार, मंगलप्रभात लोढा आणि किरीट सोमय्या या भाजपा नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.