डाॅ.संदीप डाकवेंनी साकारले राजसाहेब ठाकरे यांचे टायपोग्राफिक पोट्रेट


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड, हायरेंज बुक ऑफ रेकाॅर्ड आणि वर्ल्ड ग्रेटेस्ट बुक ऑफ रेकाॅर्ड या पुस्तकांमध्ये आपल्या नावाची नोंद केलेल्या पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील डाॅ.संदीप डाकवे यांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे टायपोग्राफिक पोट्रेट तयार केले आहे त्याची भुरळ सर्वांनाच पडत आहे. 14 जून रोजीच्या राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सदर चित्राची निर्मिती डाॅ.संदीप डाकवे यांनी केली आहे. राजसाहेब ठाकरे, राजसाब, मनसे, मनसे अध्यक्ष, मराठीहृदयसम्राट, हिंदूजननायक इ.शब्दांची सुंदर मांडणी करुन हे चित्र तयार केले आहे.

शब्दचित्रे साकारण्यात माहीर असलेल्या डाकवे यांनी यापूर्वी अनेकांची हुबेहुब शब्दचित्रे रेखाटली आहेत. मात्र विविध विशेषणे आणि शब्दांचा अप्रतिम वापर करुन डॉ.डाकवे यांनी टायपोग्राफीक पोट्रेट स्वरूपात साकारलेले राजसाहेब ठाकरे  यांचे हे पहिलेच चित्र आहे.

संविधान प्रवेशिकेतून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, पुस्तकांच्या माहितीतून कुसुमाग्रज, मोरपिसावर संत तुकाराम-शाहू महाराज, शब्दातून विठ्ठल, विविध शब्दातून कर्मवीर, स्वभाव वैशिष्ट्यातून शिवेंद्रराजे, संगीत वाद्यातून लतादिदी, 83 पोस्टकार्डातून शुभेेच्छा पत्रे, 72 वहयातून पोट्रेट, अक्षर अभंग चित्र, पेपर कटींग आर्ट-स्टिपलिंग-स्क्रिबलिंगमधून कलाकृती, 54 चित्रातून शुभेच्छा, पोस्टकार्डवर 133 शब्द लिहून आदरांजली, अक्षरगणेशा, रांगोळी, खडूमधून अष्टविनायक, जाळीदार पिंपळपानावर कलाकृती अशा स्वरुपाचे नावीण्यपूर्ण कलाप्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी हाताळले आहेत.

याशिवाय विविध क्षेत्रातील सुमारे 12,000 मान्यवरांना त्यांनी चित्रे भेट दिली आहेत. कलेतून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे तसेच पत्रकारिता व अन्य लेखनाच्या माध्यमातून साहित्यात क्षेत्रातही आपला ठसा उमटवत आहेत. डाॅ.डाकवे यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून 4 वेळा तर विविध संस्थांनी 50 पेक्षा जास्त पुरस्कार देवून गौरवले आहे. त्यांच्या कार्याची दखल प्रिंट मिडीयासह इलेक्ट्रॉनिक मिडीयाने देखील घेतली आहे. सुंदर कल्पकेतून डाॅ.संदीप डाकवे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे तयार केलेले टायपोग्राफिक पोट्रेट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.