६१ पुरस्कार प्राप्त निर्मल ग्राम मान्याचीवाडीचा राज्य शासनाच्या वतीने विशेष सन्मान करण्यासाठी प्रयत्न करणार : गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई.

   

माझी वसुंधरा अभियानांतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मान्याचीवाडीचा गौरव केल्यानंतर सरपंच व ग्रामस्थांनी ना.शंभुराज देसाई यांची भेट घेऊन त्यांना पेढा भरवून आनंद व्यक्त केला.

ढेबेवाडी|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
६१ पुरस्कार प्राप्त निर्मल ग्राम मान्याचीवाडी ग्रामीण विकासाचे अभ्यासकेंद्र बनले आहे. मान्याचीवाडीने गेल्या 20 वर्षांपासून राज्याला दिशादर्शक काम केले आहे. मान्याचीवाडीच्या ग्रामविकासाच्या योगदानाची माहिती मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना देऊन राज्य शासनाच्या वतीने मान्याचीवाडीचा विशेष सन्मान करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी दिली.

      माझी वसुंधरा अभियानांतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल मुंबई येथे मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचा मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री ना.आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आल्यानंतर सरपंच रवींद्र माने, उपसरपंच अधिकराव माने, सदस्य रामचंद्र पाचुपते, दिलीप गुंजाळकर, उत्तमराव माने, सर्जेराव माने, रमेश आसळकर, दादासो माने, संभाजी माने, सुनील आसळकर आदि ग्रामस्थांनी मंत्री देसाई यांची मुंबई येथे भेट घेतली. त्यावेळी गावकऱ्यांशी बोलताना ही माहिती दिली. 

     पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गावाने आतापर्यंत ६१ पुरस्कार मिळवत गावासह तालुक्याचाही लौकिक वाढविला आहे. ग्रामीण विकासात या गावाने अखंडीतपणे वीस वर्षे सातत्य ठेवले आहे. यामुळे अन्य गावांंनाही प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या या योगदानाची माहिती मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना देणार असून लवकरच शासनाच्या वतीने या गावचा विशेष सन्मान करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही ना.शंभूराज देसाई देसाई यांनी दिली.