ढेबेवाडी| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने झेंडा फडकविला. गावकऱ्यांना याबाबतची माहिती मिळताच गावात एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला. शासनाच्या वतीने रविवारी सकाळी मुंबई येथे येथील गावकऱ्यांना राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी या छोट्याशा गावाने वीस वर्षांत राज्य आणि केंद्रशासनाच्या ६० पुरस्कारांवर गावाचे नाव कोरले आहे. माझी वसुंधरा पुरस्काराची भर पडल्याने आता ६१ झाली आहे. आतापर्यंत संत गाडगेबाबा स्वच्छग्राम पुरस्कार, तंटामुक्त गाव पुरस्कार, पंचायत सशक्तीकरण पुरस्कार, गौरवग्राम पुरस्कार, पर्यावरण संतुलीत सम्रध्दगांव पुरस्कार, निर्मलग्राम पुरस्कार आदिंसह शासनाचे विविध पुरस्कार मिळविलेले हे गांव आता ग्रामीण विकासाचे अभ्यासकेंद्र बनले आहे.
राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये भूमी, जल, आकार, वायू आणि अग्नी या पंचतत्वावर आधारीत असलेल्या या अभियानात व्रक्षलागवड, व्रक्षसंवर्धन, कचरा व्यवस्थापन, पाणीव्यवस्थापन, प्लास्टिक बंदी, वायू प्रदुषण, रुफटॉप वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा व्यवस्थापन, रोपवाटिका आदिबाबींची यामध्ये तपासणी करण्यात आली.
या स्पर्धेसाठी शासनाच्या वतीने २९ मे रोजी तपासणी करण्यात आली होती. त्याबाबतचा अहवाल संबंधीत तपासणी समीतीने शासनाकडे सादर केल्यानंतर मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने सर्वोत्तम कामगिरी केल्याचे पत्र अभियान संचालक सुधाकर बोबडे यांनी ग्रामपंचायतीला पाठविले असून रविवारी मान्याचीवाडी गावचा गौरव करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. ही बातमी गावात समजताच गावकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. यावेळी सरपंच रवींद्र माने, उपसरपंच अधिकराव माने, सदस्य रामचंद्र पाचुपते, संगिता माने, लता आसळकर, सुजाता माने, ग्रामसेवक प्रसाद यादव, दादासो माने, विकास माने, सर्जेराव माने, उत्तमराव माने आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
--------------------------------------------------------------
एकीच्या बळावर मिळविले यशः सरपंच रवींद्र माने
गावाने आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळविले. मात्र हे अभियान त्या तुलनेत मोठे आव्हान होते. लहान गावाने या अभियानात यश मिळविताना मोठी कसरत होती. मात्र गावकऱ्यांच्या एकीतून आणि प्रशासनाच्या सहकार्याने हे शक्य झाले.-
------------------------------------------------------------