एका पानावर लिहला संपूर्ण हरिपाठ


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

आषाढी वारीचे औचित्य साधून पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील अक्षर वारकरी डाॅ.संदीप डाकवे यांनी 34 सेमी बाय 20 सेमी या आकाराच्या एका पानावर संपूर्ण हरिपाठ लिहण्याचा प्रयत्न केला आहे. हरिपाठ म्हणजे नेहमी ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेली अभंग रचना होय. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला महत्त्वाचे स्थान आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव आणि संत निवृत्तीनाथ यांनी हरिपाठाचे अभंग रचलेले आहेत. यामध्ये मुख्यत्वे संत ज्ञानेश्वर महाराज कृत अभंग जास्त गायले जातात.

डाॅ.संदीप डाकवे हे गेले काही वर्षापासून आषाढी वारीचे औचित्य साधून एक वेगळा, नावीण्यपूर्ण कलात्मक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. यंदाचे वारीचे औचित्य साधून त्यांनी एका पानावर हरिपाठ लिहला आहे.

यापूर्वी डाॅ.डाकवे यांनी टी शर्टवर विठूरायाचे चित्र, मोरपिसावर संत तुकारामांचे चित्र, शब्दात विठ्ठलाच्या चित्रांचे रेखाटन, 16 फुट बाय 2 फुट आकाराच्या पोस्टरातून वारकऱ्यांना शुभेच्छा, घराच्या भिंतीवर 14 फूट बाय 6 फूट आकारात वारीचे भव्यदिव्य चित्र, अक्षर अभंग वारी उपक्रम, न अनुभवलेली वारी हस्तलिखित असे नावीण्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या या वैविध्य उपक्रमांची दखल प्रिंट मिडीयांसह इलेक्ट्राॅनिक मिडीयाने वारंवार घेतली आहे.

सुलेखनाची आणि पत्रलेखनाची आवड असलेल्या डाॅ.संदीप डाकवे यांनी यापूर्वी विविध कलाप्रकार हाताळले आहेत त्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड या पुस्तकाने तीनदा, हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड आणि वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड या पुस्तकांनी घेतली आहे. एका पानावर हरिपाठ लिहून अक्षर वारकरी डाॅ.संदीप डाकवे यांनी पांडूरंगाच्या चरणी आपली कला अर्पण केली आहे.