विधवा प्रथा बंद करण्याचा पानवळवाडी ग्रामस्थांचा क्रांतिकारक निर्णय. वांग खोऱ्यात सर्वत्र या निर्णयाचे कौतुक.

वटपौर्णिमे निमित्त विधवा महिलांचा हळदीकुंकू समारंभात यथोचित सन्मान.कृष्णाकाठ वृत्तसेवा | (चंद्रकांत चव्हाण)
विधवा महिला ही सुद्धा एक माणूसच आहे व तिला मानाने आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, तो हिरावून घेणे हा एक प्रकारे कायद्याचा भंग आहे. विधवा प्रथेमुळे संबंधित महिलेच्या अधिकारावर गदा येत आहे म्हणून विधवेला समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी गावातून विधवा प्रथा बंद करण्याचा क्रांतिकारक निर्णय मालदन- पानवळवाडी तालुका पाटण येथील या छोट्याशा वाडी ने घेतला आहे. येथील तरुण युवक व ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन जनजागृती करून महिलांच्यात जागृती निर्माण केली. विधवा महिलांच्या घरातील सर्व लोकांना विधवा प्रथा बंद करण्याचा मानस पटवून दिला. या क्रांतिकारक निर्णयाने पानवळवाडी ग्रामस्थांनी एक सन्मानजनक पुरोगामी पाऊल उचलले आहे.

आपल्या समाजात पती निधनानंतर अंत्यविधी वेळी त्या विधवेच्या बांगड्या फोडणे,तिच्या कपाळावरील कुंकू पुसणे,तिचे सौभाग्यांलंकार काढून घेणे पुढे कोणत्याही धार्मिक कार्यात तिला सहभागी होता येत नाही अशा प्रथा आहेत हा तिच्या सन्मानाचा अपमान आहे.कायद्याने प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे मात्र वरील प्रथा परंपरेने तिच्या हक्कावर गदा येते व कायद्याचे उल्लंघन होते.                      

आपल्या देशात व समाजात महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी समाजातील ही विधवा प्रथा बंद करून संबंधित विधवा महिलेला सन्मान मिळावा याकरिता उद्या वटपौर्णिमा या सणाचे औचित्य साधून सकाळी ९ वाजता भव्य हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 15 विधवा महिलांही सहभागी होणार आहेत. या समारंभात त्यांचा यथोचित सन्मान होणार आहे. या निर्णयाचे सर्व महिलांनी व गावातील नागरिकांनी कौतुक केले आहे.                 
या आगळ्यावेगळ्या समारंभाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वय वर्ष 36 ते 90 वर्षांच्या विधवा आज्जी सुद्धा या हळदी कुंकू समारंभात सहभागी होणार आहेत. खरोखर हा महिलांना सन्मान देणारा व विकृत समाजापासून संरक्षण मिळणारा हा निर्णय खूप मोलाचा आहे. पानवळवाडीच्या या निर्णयाचे तालुक्यातील इतर गावांनीही आदर्श घ्यावा असे असे क्रांतिकारक पाऊल येथील ग्रामस्थांनी उचलले आहे.              
 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व महिलांच्यात जनजागृती करण्यासाठी येथील युवक, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक व येथील मुंबई स्थित युवकांनी खूप परिश्रम घेतले आहेत.