काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..

रोखठोक.....डॉ. संदीप डाकवे.

गेली 15 वर्षे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या ताब्यात असलेली काळगांव विकास सेवा सोसायटीमध्ये यंदा सत्तांतर झाले. 15 वर्षे गुलालाची आस लावून बसलेल्या कार्यकर्त्यांनी काल गुलालाची रंगपंचमीच केली. हा निकाल देसाई गटाला विचार करायला लावणारा आहे. पंचायत समितीचे गटनेते पंजाबराव देसाई यांच्या एकहाती वर्चस्वाला या निकालाने धक्का दिला आहे.

काळगांव विकास सोसायटीची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर तत्कालीन चेअरमन पंजाबराव देसाई यांनी सोसायटी अत्याधुनिक संगणकीकृत केली. हे नाकारुन चालणार नाही. तद्नंतरच्या काळात सलग 15 वर्षे सोसायटी ताब्यात असल्याने देसाई गट तसा यंदा मरगळलेलाच वाटला. तर ‘यंदा नाही तर कधीच नाही’ अशी इच्छा मनामध्ये बाळगून मुंबईमध्ये युवकांनी चांगलीच तयारी केली होती.

यंदाची सोसायटीची निवडणूक सर्व तरुणांनी हातात घेतली होती. सोशल मिडीयाचा योग्य वापर त्यांनी केला. मुंबईमध्ये  राहून त्यांनी मायक्रो प्लॅनिंग केले होते. विशेष म्हणजे पॅनेल तयार करताना युवा नेते सचिन भाऊ आचरे यांना त्यांनी प्रमोट केले. यशवंतराव चव्हाण शेतकरी वाचवा पॅनेल असे नाव टाकून त्याला भावनिक आणि वैचारिक जोड दिली. प्रचाराच्या शेवटच्या वेळेपर्यंत विभागामधील सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेवून त्यांना बेरजेत घेतले. सर्व सोसायटीत सत्तांतर करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाची झूल बाजूला ठेवायला सांगितली. बॅनर, पत्रक यावर किंवा अन्य बाबींवर राष्ट्रवादीचे चिन्ह, पक्षाचे पदाधिकारी यांचे उल्लेख जाणीवपूर्वक टाळले. याच ठिकाणी त्यांनी लोकांची मने जिंकली होती. त्यानंतर अपेक्षित असा निकाल त्यांना मिळाला.

सोशल मिडीया फेम संजय सावंत यांनी सोशल मिडीयावर चांगलीच वातावरण निर्मिती केली. युवा नेते सचिन भाऊ आचरे, युवा नेते संजय आंब्रूळकर, युवा नेते अनिल डाकवे यांनी सर्व तरुण आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सोबत घेवून विजय संपन्न केला.

पंजाबराव देसाई (तात्या) यांनी या निकालानंतर आत्मपरिक्षण करुन काय चुकले याचा विचार करणे गरजेचे आहे. तरच त्यांना येणाऱ्या निवडणूकांना विश्वासाने सामोरे जाता येईल. पक्ष किंवा गट याच विचार न करता वेगळे पॅनेल टाकून निवडणूक जिंकता येते हे या निवडणूकीच्या निमित्ताने पाहायला मिळाले. गटातटाच्या राजकारणाला एकप्रकारे टक्कर दिली असे म्हणता येईल.

सारांश, काळगांव विकास सोसायटीत झालेले सत्तांतर हे तरुणाईने केलेले आहे. येथे देसाई गट 100 टक्के हरला हे मान्य करावा लागेल. पण राष्ट्रवादी जिंकली असे म्हणता येणार नाही. कारण हा विजय यशवंतराव चव्हाण या नावाचा आहे.

यानिमित्ताने एक सांगावे वाटते की, सर्व वाडया वस्त्यावरील तरुणाई गटतट, पक्ष सोडून बाहेर आली तर आपल्या भागाचा सर्वांगीण विकासासाठी "मास्टर प्लॅन" करणे सोपे जाईल यात शंकाच नाही. 

तसेच या विजयाला पक्षीय लेबल लागले तर भविष्यातील राजकारणावर त्याचे परिणाम होवू शकतील.

काळगांव सोसायटीतील विजेत्या उमेदवारांचे, सर्व युवा नेतृत्त्वाचे, मतदारांचे या निमित्ताने मनापासून अभिनंदन...!