रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्यांच्या भविष्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते: ॲड. सूर्यकांत मिरजे.





घोगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

रॅगिंग मुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होते विद्यार्थी शिक्षण घेत असताना जर एखादा विद्यार्थी रॅगिंगचा बळी ठरला तर त्याचे खूप मोठे शैक्षणिक, मानसिक नुकसान होते.या करीता रॅगिंग रोखण्यासाठी शिक्षण संस्थांनी, विद्यापीठांनी, महाविद्यालयांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जर महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार आढळून आल्यास रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यावर शिक्षण संस्था, महाविद्यालये, यांनी तातडीने अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. रॅगिंग होत असलेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित कमिटीकडे तक्रार देणे गरजेचे आहे तरच ते थांबण्यासाठी प्रयत्न होतील. रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्यांच्या भवितव्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील ॲड. सूर्यकांत मिरजे यांनी केले. 

घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा इंजिनिअरिंग (बी टेक) या महाविद्यालयात आयोजित Student Grievances & Redressel committee अंतर्गत Awareness about student grievances, anti-ragging,anti sexual harrasment.

या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रमुख अतिथी म्हणून विशेष सरकारी वकील सूर्यकांत मिरजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. 

यावेळी ॲड.अमृता यादव यांचीही या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती.

यावेळी पुढे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ॲड. सूर्यकांत मिरजे म्हणाले रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देणे, त्याचा निकाल रोखणे, त्यांची शिष्यवृत्ती रद्द करण्याचा तसेच प्रसंगी त्यास निलंबित करण्याचा अधिकार महाविद्यालयाला असल्याचे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंग विरोधी कायद्याची माहिती दिली.

यावेळी ॲड.अमृता यादव विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या भारत महासत्ता होण्यासाठी सर्व भारतीयांनी कायदे, नियम याचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. भारतीय न्यायव्यवस्था, रचना सर्वात चांगली आहे. तिचा प्रत्येकाने सन्मान करावा. प्रचंड वेगाने वाढत असणाऱ्या व वापर होणाऱ्या सोशल मीडियाकडे त्यांनी लक्ष वेधले असता सध्याच्या पिढीने सोशल मीडियाचा गरजेपुरता वापर करावा अतिवापर हा धोकादायक आहे. सध्याची पिढी चित्रपटातील हीरोचा आदर्श घेऊ पाहत आहे ही शोकांतिका आहे. मात्र चित्रपटातील हिरो पेक्षा वास्तवातील महापुरुषांचा त्यांच्या विचारांचा आचारांचा, कार्याचा आदर्श घ्यावा असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूनम यादव यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. तर सर्व उपस्थित मान्यवर व विद्यार्थी यांचे तेजश्री तिकूडवे यांनी आभार मानले.